सातारा जिल्हा बॅंक : मतदारांच्या उचलाउचलीत कोणाची सरशी? | पुढारी

सातारा जिल्हा बॅंक : मतदारांच्या उचलाउचलीत कोणाची सरशी?

सातारा : पुढारी वृत्तसेवा” image=”http://”][/author]

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खटाव तालुका सोसायटी मतदारसंघात माजी आमदार प्रभाकर घार्गे व राष्ट्रवादीचे नंदकुमार मोरे यांच्यात टस्सल होत आहे. कडवे आव्हान असल्याने राष्ट्रवादी व घार्गे गटानेही मतदारांची उचला उचली केली आहे. यामध्ये कोणाची सरशी होते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. घार्गे यांच्या अनुपस्थितीत त्यांची टीम तैनात आहे. तर मोरे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी झटत असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच घार्गेंना डावलण्याची भूमिका घेतली होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा बँकेत हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला होता. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी प्रभाकर घार्गेंनी स्वतःचा अर्ज कायम ठेवल्याने राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलचे नंदकुमार मोरे यांच्या समोर आव्हान उभे राहिले आहे. आता मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना दोन्ही उमेदवारांनी आपले मतदार ‘सेफ’ करत विरोधी पार्टीचे मतदार फोडण्यासाठी अमिष दाखवले जात आहे.

घार्गे न्यायालयीन कचाट्यात सापडल्यावर पक्षाने आणि तालुक्यातील अंतर्गत विरोधकांनी डाव साधला असल्याचे चित्र उभे करुन घार्गेंची टीम सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलीने मतदारांच्या गाटीभेटीवर चांगलाच जोरही दिला आहे. काही मतदारांना सहलीवरही पाठवले आहे. तर आणखी मतदार गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नंदकुमार मोरेंसाठी जिल्ह्यातील तसेच खटाव तालुक्यातील नेत्यांनी स्वतः लक्ष घालून प्रयत्न करावेत, असे आदेश देत अजितदादांनी मला रिझल्ट पाहिजे असे ठणकावले आहे. दादांचा आदेश निघाल्याने राष्ट्रवादीनेही गायत्रीदेवींच्या नेतृत्वाखाली हालचाली वाढवल्या आहेत. प्रतिष्ठेच्या लढतीत राज्यातील सत्ताधारी पक्षाची ताकद पाठीशी असल्याने मोरेंनीही आरपारचे प्रयत्न सुरु केले आहेत. जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोरेंच्या आणि घार्गेंच्या पाठीशी उघडपणे आणि आतल्या बाजूने कोण उभे राहणार यावर सोसायटीचा शिलेदार ठरणार आहे.

Back to top button