नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सत्ता गेल्यावर माणसे अस्वस्थ होतात. पण, अस्वस्थता इतक्या टोकाला जाऊ नये, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत बोलताना लगावला.
मुंबईत भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना फडणवीसांनी अमरावती, मालेगाव व नांदेडमधील हिंसाचार हा प्रयोग असल्याचे वक्तव्य केले होते. देशात अराजक निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार विरोधात विचारपूर्वक केलेला प्रयोग असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यावर फडणवीसांच्या बोलण्याचे आश्चर्य वाटते, असे शरद पवार म्हणाले.
अमरावतीमधील दंगलीत भाजपासह रझा अकादमी व युवासेनेचाही हात असल्याचे बोलले जाते. पण, मला यातील वस्तुस्थिती माहिती नाही. नेमकी माहिती घेऊन बोलेन. समज, गैरसमज आणि अफवेतून चुकीच्या काही घटना घडल्या असतील तर चौकशी नंतर कारवाई होईल. या घटनांमध्ये काहींनी कायदा हातात घेतला. तर काहींनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फायदा घेतल्याची शंका आहे. पण, त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही, असे पवार म्हणाले.
अभिनेत्री कंगना राणावत हीचे बोलणे गांभीर्याने घेण्यासारखे नाही. त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे, असे ते म्हणाले. अनिल देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंग फरार असल्याचे सांगितले जाते. ते समोर येऊन वस्तुस्थिती सांगायला तयार नाहीत. त्यामुळे अनिल देशमुखांना विनाकारण पोलिस कोठडी मिळाली व त्यांच्यावर अन्याय झाला, असे पवार म्हणाले.
रविकांत तुपकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांच्या मागण्यांसंबंधात निर्णय घेणाऱ्यांशी बोलल्या नंतरच मार्ग निघेल, असे पवार म्हणाले. नितीन गडकरींची मी नेहमी तारिफ करतो. विकासाच्या बाबतीत ते भेद करीत नाहीत. मात्र, त्यांना बळ देण्यासंदर्भात मोदींशी बोलायला हवे. कारण त्यांना बळ देणे हे मोदींच्या हातात आहे, असे पवार म्हणाले.