राष्ट्रवादीच्या खेळीमुळे जिल्हा बँकेतून काँग्रेस हद्दपार | पुढारी

राष्ट्रवादीच्या खेळीमुळे जिल्हा बँकेतून काँग्रेस हद्दपार

उंडाळे : वैभव पाटील

उंडाळे : वैभव पाटील

सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी 21 नोव्हेंबरला मतदान होत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने आपले एकतर्फी वर्चस्व यापूर्वीच सिद्ध केले आहे. तब्बल 10 जागांवर बिनविरोध विजय मिळवत केवळ बहुमताची औपचारिकता पूर्ण करणे राष्ट्रवादीकडून बाकी आहे. तसेच राष्ट्रीय काँग्रेसला जवळपास हद्दपार केले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेनंतरचा इतिहास पाहता स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. किसन वीर व त्यानंतर स्व. विलासराव पाटील उंडाळकर या तीन दिग्गज नेत्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची धुरा सांभाळली. ही धुरा सांभाळताना बँकेच्या कामकाजाचा आलेख वाढतच ठेवला. स्व. किसन वीर व स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कारकिर्दीत जिल्हा बँकेने नाबार्डचे सर्व पुरस्कार खिशात टाकत जिल्हा बँकेचा दबदबा देशभर वाढवला होता.

सध्या या बँकेत मागील दशकापासून माजी मंत्री विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करून जिल्हा बँकेची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने आपल्या हाती घेतली. तरीही विलासराव पाटील हे या बँकेचे संचालक राहिले ते त्यांच्या निधनापर्यंत या बँकेचे संचालक होते.

अर्ज माघारीच्या तसेच अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपर्यंत चर्चा सुरू होती. मात्र, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आलेली शिष्टाई अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना मान्य झाली नाही. त्यामुळेच अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना राष्ट्रवादीविरोधात लढावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. राष्ट्रवादीने अ‍ॅड. पाटील यांचा सन्मान राखला जाईल, असेही सांगितल्याची चर्चा आहे. मात्र, त्यानंतरही अ‍ॅड. उदयसिंह पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. याशिवाय जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसला एकही जागा न देता काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसने एकप्रकारे ठेंगाच दाखवला आहे.

एकेकाळी स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांच्यामुळे जिल्हा बँकेेंवर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, आता दशकभरापासून हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. आज सातारा जिल्हा बँकच काय पण जिल्ह्यातील संपूर्ण सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, येनकेन प्रकारे राष्ट्रवादीने तडजोडी, राजकीय डावपेच खेळत आपल्या विरोधी पक्षाला किंवा किंवा सहकारी मित्राला बरोबर घेऊन विरोधकांना दूर करत आहे.

माजी मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांनी राष्ट्रवादीला नवीन असताना मोठी साथ केली होती, हे अख्खा जिल्हा जाणून आहे. पण त्याच राष्ट्रवादीने अनेकदा विलासराव पाटील-उंडाळकर यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण उंडाळकर यांच्या राजकीय कौशल्याने राष्ट्रवादीची सातत्याने कराड दक्षिणमध्ये दमछाक होत होती.परंतु, त्यांना कधीही यश आले नाही.

कराड पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो उंडाळकर पर्याय आणि काँग्रेसची बेरीज नेहमी वरचढ राहायची. ही सल राष्ट्रवादीला सध्या असून त्यांनी काँग्रेसचे नामोनिशान मिटवण्यासाठी अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या विरोधात सहकार मंत्री यांना उमेदवारी देऊन आपण बलाढ्य आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे सातारा जिल्ह्यात जिल्हा बँकेचे निवडणुकीचा विचार करता सध्या काँग्रेसला कुठेही विश्वासात न घेता आणि एकही जागा न देता काँग्रेसला सहकारातून बाजूला फेकले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्या सहकाराच्या जीवावर काँग्रेस मोठी झाली, तोच सहकार आज काँग्रेस पासून पूर्णतः दूर गेला आहे.

ही सर्व खेळी राष्ट्रवादीकडून खेळली जात आहे. त्याचा पत्ता राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना अद्याप का लागला नाही? हे सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला समजत नाही. राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या ताकदीवर जिल्हा बँकेत नेतृत्व करत पॅनेल उभे करण्याची गरज असताना राष्ट्रीय काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्या खेळीकडे बघत शांत राहिली. त्यामुळे काँग्रेसची जिल्हा बँकेत बिकट अवस्था झाली आहे.

अस्तित्वासाठी सहकार मंत्र्यांविरुद्ध मैदानात…

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, जिल्हा बँकेत काँग्रेसला स्थान मिळावे, अशी मागणी केली होती. पण काँग्रेस नेत्यांची ताकद कमी पडली आणि चर्चेतूनही मार्ग निघाला नाही. त्यामुळे अस्तित्व कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसविरूद्ध काँग्रेस मैदानात उतरली असून, संपूर्ण राज्याचे कराड तालुक्यातील लढतीकडे लक्ष लागले आहे.

Back to top button