आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात काय करत होते? नवाब मलिक यांची विचारणा ! | पुढारी

आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात काय करत होते? नवाब मलिक यांची विचारणा !

मुंबई; पुढारी ऑनलाईन

त्रिपुरातील घटनेवरून राज्यात अमरावती, नांदेड आणि यवतमाळमध्ये मुस्लीमांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. या मोर्चांमध्ये झालेल्या हिंसाचावरून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते अनिल बोंडे यांनीच दंगल घडवल्याचा आरोप केला. दंगली घडवण्यासाठी मुंबईतून पैसा आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

राज्यात झालेल्या हिंसाचारावरून नवाब मलिक यांनी भाजपवर चांगलाच हल्ला चढवला. पैशाचा वापर करून सरकार पाडता येत नाही, हे भाजपनं लक्षात घ्यावं असा टोलाही त्यांनी लगावला. मालेगावात गुन्हा दाखल झालेला नगरसेवक एमआयएमचा नगरसेवक राष्ट्रवादीचा नाही. तरुणांना पैशाचे प्रलोभन दाखवलं गेलं, पर्याय संपतात तेव्हा दंगली घडवल्या जातात हे भाजपची जुनी सवय असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.

आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात काय करत होते? नवाब मलिकांची विचारणा !

नवाब मलिक यांनी रझा अकादमीच्या कार्यालयात आशिष शेलार गेले होते असा आरोप केला. रझा अकादमीच्या कार्यालयात जाणं हा कटाचा भाग होता का? अशी विचारणा त्यांनी केली. त्यांनी आपल्याकडे एक फोटोही असल्याचे सांगितले. राज्यामध्ये रझा अकादमीची दंगल घडवण्यासारखी ताकद नाही, काही मौलाना फिरत असतात. मात्र, त्यांच्या कार्यालयात बसून शेलार बैठक घेत होते. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल, सर्व दंगलीतील आरोपींना अटक करण्यात येईल असा दावाही त्यांनी केला.

मलिकांच्या आरोपांनंतर आशिष शेलारांचा तीळपापड

फोटोंच्या माध्यमातून अफवांचे राजकारण करणे हा तुमचा धंदा झाला असून चार वर्षांपूर्वींचा फोटोचा काय संबंध अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे. त्यांनी फोटोवरून खुलासा करताना सांगितले की, ती बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झाली नाही. जुने फोटो दाखवून सरकारचे अपयश लपवण्याचे काम करू नका. सवय जात नसेल, तर रझा अकादमी सोबतचे आम्हाला फोटो दाखवावे लागतील तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

हे ही वाचलं का ?

Back to top button