साखर आयुक्तांचे शेतकरी संघटनेच्या नेत्यांना निमंत्रण | पुढारी

साखर आयुक्तांचे शेतकरी संघटनेच्या नेत्यांना निमंत्रण

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा

सांगली, सातारा जिल्ह्यात एकरकमी एफआरपीच्या प्रश्नावरून शेतकरी संघटनांची जोरदार आंदोलन सुरू आहेत. सांगली जिल्ह्यात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याची दखल साखर आयुक्तांनी घेतली आहे. विविध शेतकरी संघटनेच्या नेत्यांना  बैठकीला निमंत्रित केले आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजता पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात ही बैठक होणार आहे, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.

बैठकीला रघुनाथ पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे,  भागवत जाधव, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील, पंजाबराव पाटील आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. खराडे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीसाठी तीव्र केली आहेत. एकरकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी दोनदा साखर कारखान्यावर मोटर सायकल रॅली काढण्यात आली होती. मागण्या मान्य न झाल्याने  कार्यकर्त्यांनी तासगाव, वाळवा, पलूस आणि कडेगाव तालुक्यात ट्रॅक्टर पंचर करणे, हवा सोडणे, ऊस तोड थांबविणे आणि ट्रॅक्टर पेटविणे आदी आंदोलने सुरू केली आहेत.”

“सातारा जिल्ह्यातही अशीच आंदोलने संघटनेकडून सुरू आहेत. याशिवाय अन्य शेतकरी संघटनेच्या वतीने  आंदोलने करण्यात येत आहेत”, असेही खराडे यांनी सांगितले. या आंदोलनाची दखल घेऊन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे साखर आयुक्त कार्यालयात मंगळवारी दुपारी अडीच वाजता या बैठीकीचे आयोजन केले आहे. सांगली जिल्ह्यात आता पर्यंत दत्त इंडिया आणि दालमिया कोकरुड या दोनच कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे अन्य कारखान्यांनी अद्याप कोणतीच भूमिका घेतली नाही. या बैठकीकडे सर्व ऊस उत्पादकांचे लक्ष आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button