इस्लामपूर : विकास आघाडी-राष्ट्रवादीत खडाजंगी - पुढारी

इस्लामपूर : विकास आघाडी-राष्ट्रवादीत खडाजंगी

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

बोगस टेंडर, एकाच रस्त्यावर दोन-दोनदा निधी खर्च तसेच व्यायामशाळा हस्तांतराच्या मुद्द्यावरून पालिकेच्या (इस्लामपूर)सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधकांच्यात जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली. दोन्ही बाजूकडील नगरसेवक आक्रमक झाल्याने सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. रस्ता कामाला एनओसी देणार्‍या अधिकार्‍यांवर फौजदारी दाखल करण्याचा इशारा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दिला.

नगराध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत पालिकेची सभा पार पडली. सुरूवातीलाच वैभव पवार, अमित ओसवाल यांनी ज्या रस्ता कामाची वर्कऑर्डर काढण्यात आली आहे. त्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

यावर नगराध्यक्ष पाटील यांनी संबंधित बांधकाम विभागाला या कामाला एनओसी कोणी दिली, असा सवाल केला. यावर त्या विभागाचे अधिकारी पाटील यांनी नजरचुकीने एनओसी देण्यात आली होती. मात्र हे काम थांबविण्यास सांगितले आहे, असा खुलासा केला. आनंदराव पवार यांनी या रस्त्याचे उद्घाटन करणार्‍यांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी केली.

नगराध्यक्ष पाटील संतप्त झाले. ते म्हणाले, आमच्या सत्ताकाळात असे गैरप्रकार घडू देणार नाही. एकाच रस्त्यावर दोन-दोनदा निधी उचलू देणार नाही. ज्यांनी कोणी हा प्रकार केला आहे त्यांच्यावर फौजदारी दाखल करू. विश्वास डांगे म्हणाले, जाणूनबुजून कोणी हा प्रकार केलेला नाही. नजरचुकीने झाला असेल.

बोगस टेंडरवरून खडाजंगी…

विक्रम पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सत्ता काळात अनेक बोगस टेंडर काढण्यात आल्याचा आरोप केला. यावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक बनले. त्यांनी पाटील यांना शब्द मागे घेण्यास सांगितले. यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.

शहाजी पाटील म्हणाले, काहींना खोटे बोला पण रेटून बोला, अशी सवय असते. संजय कोरे म्हणाले, काहीवेळा लोकांच्या आग्रहास्तव ठराव करावे लागतात. त्यावेळी प्रशासनाची हतबलता असते. अमित ओसवाल यांनी डेटा ऑपरेटर नेमणूक ठेक्याचा मुद्दा उपस्थित केला.

शौचालय नेमके बांधले कोणी?

वैभव पवार यांनी अंबिका उद्यानातील व्यायामशाळा, पालिका शॉपिंग सेंटरमधील शौचालयाचा मुद्दा उपस्थित केला. यावर खंडेराव जाधव म्हणाले, निर्णय झालेल्या विषयावर पुन्हा चर्चा नको. विजयभाऊ पतसंस्थेच्या कार्यालयाजवळील शौचालयावर पालिकेने 77 हजार रुपये खर्च केल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. शहाजी पाटील यांनी हा खर्च संस्थेने केल्याचे सांगितले. यावर विक्रम पाटील यांनी संस्थेने बांधलेले शौचालय कुठे गायब झाले, याचा शोध घ्या, असा टोला मारला.

 

Back to top button