MLA Shivendra Raje : खासदारांचे पेंटिंग हा बालिशपणाचा कळस : आ.शिवेंद्रराजे भोसले | पुढारी

MLA Shivendra Raje : खासदारांचे पेंटिंग हा बालिशपणाचा कळस : आ.शिवेंद्रराजे भोसले

सातारा; पुढारी वृत्तसेवा : खासदारांच्या पेंटिंगचा वाद महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादापेक्षा आणि काश्मिरच्या वादापेक्षाही गहण आहे. मुळात खासदारांचे पेंटिंग कुठे काढायचे याबाबत राज्यसभा निर्णय देईल, हा सर्व बालिशपणाचा कळस आहे. यातून काय साध्य होणार आहे, अशा शब्दात आमदार शिवेंद्रराजेंनी उदयनराजे (MLA Shivendra Raje) यांच्या पेंटिंगच्या विषयाची खिल्ली उडवली.

खासदार उदयनराजेंच्या पेंटिंगवरुन सध्या सातारा शहरात तणावाचे वातावरण आहे. पालकमंत्री देसाई व उदयनराजे समर्थक यांनी सामोपचाराने हा विषय मिटवला असल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावरुन भाजपचे सातारा, जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra Raje) यांनी हा तर बालिशपणाचा कळस असल्याचे म्हणत या विषयाची खिल्ली उडवली आहे.

आपल्या समर्थकांना आवर घालण्याचे काम नेत्यानेच करायचे असते. पण, नेताच रात्रीअपरात्री चित्र कुठे काढायची हे बघत फिरत असेल आणि तेथे पोलिसांशी हुज्जत घालत असेल तर अवघड गोष्ट आहे. हे चित्र काढणारे समर्थक आहेत, त्यांची बुध्दी काय हे सगळ्यांना माहिती आहे. भिंतीवर काढा त्यापेक्षा अजिंक्यतारा किल्ल्यावर चित्र काढा म्हणजे हायवेवरुन दिसेल, असा टोला लगावून शिवेंद्रराजे म्हणाले, या बालिशपणाने साध्य काय होणार आहे. हा काय सातारच्या विकासाचा विषय नाही, की शहरात अमुलाग्र बदल होणार आहे.

आमदार शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, ‘साठी बुद्धी नाठी..’ या म्हणी प्रमाणे साठीच्या दिशेने सध्या महाराजांची वाटचाल सुरु आहे. ती म्हण लागू होऊ नये, यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आवर घालावा. विकास कामांसाठी रस्त्यावर उतरावे. पेटिंगसाठी आठवडाभर रात्री अपरात्री हा प्रकार सुरु आहे. निव्वळ बालिशपणा आणि ‘इगो’ तूनच हा विषय झाला आहे. कार्यकर्त्यांना आवर घालण्याचे काम नेत्याने करावे. त्यासाठी त्यांना परमेश्वराने बुद्धी द्यावी हीच माझी अपेक्षा आहे, असेही त्यांनी नमुद केले.

अधिक वाचा :

Back to top button