सातारा : महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर टेम्पो २०० फूट दरीत कोसळला; तिघे जखमी | पुढारी

सातारा : महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर टेम्पो २०० फूट दरीत कोसळला; तिघे जखमी

महाबळेश्वर: पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर शहरापासून दहा किमी अंतरावर तापोळा मुख्य रस्त्यावर चिखली शेड परिसरात मेटगुताड येथून तापोळाच्या दिशेने इलेक्ट्रिक साहित्य घेऊन निघालेल्या टेम्पो (एमएच ११ एजी ७७४५) चा ब्रेक फेल झाल्याने थेट दोनशे फूट दरीत कोसळला. या अपघातात तीन युवक जखमी झाले असून हा अपघात रविवारी (दि. १५) रोडी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मेटगुताड येथून इलेक्ट्रिक साहित्य घेऊन रविवारी सायंकाळी टेम्पो तापोळाच्या दिशेने निघाला होता. चिखली शेड परिसरातील वळणावर टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने हा टेम्पो थेट दोनशे फूट दरीत कोसळला. अपघातानंतर हा टेम्पो झाडामध्ये अडकला. या टेम्पोमध्ये तीन युवक होते ते जखमी झाले आहेत. रात्रीच्या अंधारात यातील एक युवक झाड, फांद्यांच्या आधाराने मुख्य रस्त्यावर आला आणि अपघाताची माहिती त्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दिली.

या अपघाताची माहिती मिळताच चिखलीचे शिवसेनेचे संतोष जाधव व सहकारी तसेच सहयाद्री ट्रेकर्सचे किरण चव्हाण संजय पार्टे व दीपक जाधव यांनी अंधारात बॅटरीच्या मदतीने तात्काळ अपघातातील जखमींना बाहेर काढले आणि त्यांना १०८ रुग्णवाहिका तसेच संतोष जाधव यांच्या खासगी गाडीने ग्रामीण रुग्णालयात आणले. श्रीकांत गणपत बावळेकर (वय २४), विजय बजरंग मोरे ( वय २५), व सुरज यशवंत घाडगे ( वय २६ ) अशी जखमींची नावे आहे.

या अपघातात एका युवकाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तर एकाला किरकोळ दुखापत झाली व एकाच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी दोघांना त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी या टेम्पोमधील फ्रिज टीव्ही आदी इलेकट्रीक वस्तू बाहेर काढण्याचे काम सुरु होते. दोनच दिवसांपूर्वी मुकदेव येथे अपघातात चाळीस जण जखमी झाले होते. महाबळेश्वर तालुक्यातील दोन दिवसांत घडलेली अपघाताची ही दुसरी घटना आहे.

१०८ रुग्णवाहिकेला या अपघाताची माहिती देण्यात आली होती. यानंतर रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली मात्र, या रुग्णवाहिकेत असलेल्या डॉक्टरांनी मात्र जखमींना तपासण्याची व उपचार देखील तातडीने उपचार केले नसल्याचे घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button