नगर : ६७ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक | पुढारी

नगर : ६७ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक

नगर : पुढारी वृत्तसेवा : जानेवारी ते जून या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत विसापूर, पिंपरी निर्मळ, उंदिरगाव, आश्वी बुद्रूक, कोळगाव, बोधेगावसह 67 ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राज येणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या नुकत्याच 18 डिसेंबर रोजी निवडणुका झाल्या आहेत.

जानेवारी महिन्यात 59, फेब्रुवारी महिन्यात 8 अशा 67 ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाल संपणार आहे. कार्यकाल संपण्यापूर्वीच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या जातात. मात्र, अद्याप या ग्रामपंचायतींची प्रभागरचना व आरक्षण प्रक्रिया झालेली नाही. या प्रक्रियेला जवळपास महिना-दीड महिना लागतो. त्यामुळे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जानेवारी ते जून या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करा असे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

त्यामुळे शेवगाव तालुक्यातील मुंगी, बालमटाकळी, नेवासा तालुक्यातील पाचेगाव, राहुरी तालुक्यातील सडे, चिचोली, श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव, उंदिरगाव, माळवडगाव, फत्याबाद, निमगाव खैरी, राहाता तालुक्यातील दाढ बु., वाकडी, कोपरगाव तालुक्यातील कुंभारी, वारी, संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक व आश्वी खुर्द यासह 67 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त होणार आहे.

Back to top button