नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील खंबाळे शिवारात तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनविभागासह इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना यश आले आहे. चराई रोखण्यासाठी वनविभागाकडून राखीव वनक्षेत्रालगत तारेचे कुंपण घातले आहे. या कुंपणात शनिवारी (दि.१४) मध्यरात्री भक्ष्याच्या शोधात साडेतीन वर्षांचा नर बिबट्या अडकला.
रविवारी (दि.१५) सकाळी बिबट्या तारेच्या कुंपणात अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे ओमकार देशपांडे, उत्तम पाटील, सचिन अहेर, साहेबराव महाजन, संतोष चव्हाण, सुनील खानझोड यांच्यासह इको-एको फाउंडेशनचे स्वयंसेवक अभिजित महाले, अमित लव्हाळे आदी घटनास्थळी दाखल झाले. तारा शरीरात शिरून जखमी झालेला बिबट्या ओरडत होता. डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर सुरक्षित रेक्स्यू करून बिबट्याला गंगापूर रोपवाटिकेत हलविण्यात आले. बिबट्या तंदुरुस्त असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाईल, असे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा :