कोल्हापूर : तिळगूळ घ्या, गोड बोला.. मकर संक्रांत उत्साहात साजरी

कोल्हापूर : तिळगूळ घ्या, गोड बोला.. मकर संक्रांत उत्साहात साजरी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  'तिळगूळ घ्या, गोड बोला', 'आमचं तिळगूळ सांडायचं नाही, आमच्या संगं भांडायचं नाही…' या व अशा शुभेच्छांची देवाण-घेवाण करत मकर संक्रांतीचा सण रविवारी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी सार्वजनिक साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी यंदाची मकर संक्रांत आल्याने सहकुटुंब हा सण साजरा करण्यात आला.

ऊर्जा, उत्साह आणि समृद्धीचा सण म्हणजे मकर संक्रांत. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशीपासून उत्तरायण सुरू होते. यामुळे मकर संक्रांतीचा सण उत्तरायण सण म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणूनच याला मकर संक्रांत म्हणतात. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. या दिवशी तांदूळ व काळी उडीद खिचडी, काळ्या तिळापासून बनवलेल्या वस्तू, गूळ, मीठ, लोकरीचे कपडे, देशी तूप, तेल, काळ्या वस्तू, रेवडी व शेंगदाणे, अन्न व धनदान केले जाते.
दरम्यान, रविवारी घरोघरी मकर संक्रांतीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. देवाजवळ लहान-मोठ्या संक्रांती (मातीची बुडूकली व लोटकी) पूजण्यात आली. त्यात वटाणा, हरभरा, उसाची पेरं, तिळगूळ, बिब्याची माळ, वरणा अशा वस्तू ठेवण्यात आल्या. दुपारी गोडधोड पोळीचा नैवेद्य करण्यात आला. महिला-मुलींनी काळा पोशाख परिधान केला होता. सायंकाळी बालचमूंनी तिळगूळ वाटून मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. सुट्टीचा दिवस असल्याने लोकांनी सहकुटुंब विविध देवदेवतांच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. सर्वांनी मिळून एकत्रित गोडधोड जेवणाचा आवर्जून आस्वाद घेतला.

ऑनलाईन शुभेच्छांचा वर्षाव

मकर संक्रांतीच्या ऑनलाईन शुभेच्छांचा वर्षाव शनिवारी रात्रीपासूनच अखंड सुरू होता. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, ई-मेल, टेक्स्ट मेसज यांसह विविध माध्यमांतून मकर संक्रांतीच्या शुभसंदेशांची देवाण-घेवाण करण्यात आली. मकर संक्रांतीनिमित्त
करवीर निवासिनी श्री अंबाबाईची हलव्याच्या दागिन्यांसह विशेष पूजा बांधण्यात आली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news