

साई सावंत, सातारा : सातारा शहरापासून पश्चिमेला केवळ २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध कास पुष्पपठारालगत घाटवण येथे घनदाट वनराईत श्री घाटाईदेवीचे मंदिर आहे. नयनरम्य आणि विलोभनीय परिसरात असलेलं मंदिरात देवीची पाषाणातील भली मोठी स्वयंभूमूर्ती विराजमान आहे.
सातारा, पाटण, कराड, जावळी आणि वाई तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली श्री घाटाईदेवी हाकेला धावणारी व नवसाला पावणारी देवी, अशी अढळ श्रद्धा भाविकांमध्ये आहे. आठ गावांमधून यात्रेसाठी येणाऱ्या ग्रामदेवतांच्या सासनकाठ्या व पालख्या तसेच आवर्डे, ता. पाटण या गावातून पठारमार्गे दोन दिवस चालत येणारा मानाचा नंदी हेच या यात्रेचं प्रमुख आकर्षण मानलं जातं.
श्री. घाटाईदेवीची ख्याती सर्वदूर पसरली आहे आणि त्यामुळे देवीच्या वार्षिक यात्रेला होणारी भाविकांची अलोट गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा मंगळवारी दि. १० जानेवारी २०२३ रोजी चतुर्थीच्या रात्री देवीची भव्य यात्रा होत आहे. यानिमित्ताने…
सातारा शहरापासून पश्चिमेकडे सुमारे २५ किलोमीटर अंतरावर कासचे विस्तीर्ण पठार आहे. या पठाराच्या पूर्वेकडील बाजूस उंच डोंगराच्या कुशीत आणि घनदाट वनराईत श्री घाटाईमातेचे सुंदर मंदिर आहे. मंदिरातील दगडी गाभाऱ्यात मोठया शिळेच्या रूपात देवीची स्वयंभू मूर्ती हेच भक्तांचे श्रध्दास्थान आहे. प्रशस्त गाभारा, आकर्षक मंडप व उंच शिखरांमुळे मंदिर अत्यंत सुंदर व विलोभनीय दिसते. या मंदिराच्या बाजुला श्री वाघजाई मातेचे देखणे मंदिर आहे. मंदिराच्या सभोवताली मोकळी जागा असून, प्रदक्षिणा मार्ग म्हणून या जागेचा वापर केला जातो.
दहा ते बारा वर्षांपूर्वी या जागेभोवती संरक्षक भिंत उभी होती. तिला 'पवळी' असे संबोधले जायचे. या पवळीबाहेर मात्र घनदाट झाडी आहे. मंदिराचे प्रांगण, मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत असलेल्या पायऱ्यावरून मंदिरापर्यंत जाता येते मंदिराच्या दक्षिण बाजूला गायमुख म्हणून प्रसिद्ध असलेले पाण्याचे दोन मोठे झरे आहेत. या झऱ्यातून थंडगार आणि अत्यंत चवदार पाणी वाहते. हे पाणी साठविण्यासाठी जवळच एक छोटीशी विहीर बांधण्यात आली आहे. त्याशिवाय सुमारे ५० हजार लीटर क्षमतेची व पाच लाख रूपये खर्चुन
बांधण्यात आलेल्या टाकीतील पाणी यात्रेकरु पिण्यासाठी वापरतात. मंदिरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर घाटवण हे दहा ते बारा घरांचे छोटेसे गाव आहे. ही वस्ती वगळता या परिसरात कुठेही मानवी वस्ती नाही.
सातारा, पाटण, जावळी व वाई तालुक्यांतील बहुसंख्य भाविकांची श्री घाटाईमाता कुलस्वामिनी आहे. परळी, मेढा व तारळे भागातील अनेक गावात देवीचे मानकरी आहेत. पूर्वीच्या काळी देवस्थानतर्फे मानकरी गावांना मानाचे ताम्रपट दिले होते. आजही यापैकी काही गावांकडे हे ताम्रपट असल्याचे सांगितले जात आहे. देवीच्या मालकीची मंदिर परिसरात सुमारे ४६० एक जमीन असल्याचे भक्तगण सांगतात. लाखो रूपये किंमतीचे देवीचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत.
देवीच्या भक्तपरिवाराकडे ही इनाम वर्गातील जमीन त्यांच्या उदरनिवार्हासाठी देण्यात आली आहे. यात्राकाळात मानकरी गावातून येणाऱ्या भक्तांसाठी या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा आजही दिला जातो. देवस्थानची इनाम वर्गातील काही जमीन उरमोडी धरण प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात गेली असल्याची माहिती मिळत आहे. देवीचे सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने जे सध्या शिल्लक आहेत ते बँक लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले आहेत. यात्रेच्या मुख्यदिवशी हे दागिने, अलंकार देवीच्या अंगावर चढवले जातात.
'नित्य घडो सेवा श्री घाटाईमाते, तुझे गुण गाता आम्हा सुख वाटे, सदबुद्धी सन्मार्ग दावी आम्हांशी, नमस्कार अमुचा तव चरणाशी'. अशा भक्तीभावाने भारावलेले लाखो भक्तगण दरवर्षी जानेवारी महिन्यात चतुर्थीला भरणाऱ्या यात्रेत देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यात्राकाळात जमा होणाऱ्या तसेच भाविकांकडून वेळोवेळी दिल्या गेलेल्या देणगीच्या रक्कमेतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. अजूनही मोठे काम करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी भाविक भक्तांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.
नित्रळ, सावली, रोहोट, पाटेघर,वडगाव, कुरूळ, कासाणी, आपटीमुरा, सांगवीमुरा, कुडेघर, आटाळी, आवर्डे, ता. पाटण येथील सासनकाठ्या, पालख्या वाजत-गाजत यात्रेत येतात. या
यात्रेत प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे आवर्डे येथून दोन दिवस पठारावरून चालत येणाऱ्या मानाच्या नंदीचे. पाठीवर भलेमोठे दोन नगारे घेवून हा मानाचा नंदी देवीच्या भेटीसाठी येतो. यात्रेदिवशी दुपारी दीडच्या सुमारास नंदी आणि आवर्डे ग्रामस्थ यात्रास्थळी पोहोचतात.त्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेच्या सोहळयाला प्रारंभ होतो. रात्री साडेदहाच्या सुमारास परळी भागातील पालख्या वाजत-गाजत यात्रेत दाखल होतात. रात्री १२ वाजता देवीची महाआरती झाल्यानंतर यात्रेतील मुख्य कार्यक्रम छबीना मिरवणूक सुरू होते. छबिना मिरवणूक पहाटे चारवाजेपर्यंत सुरू असते. यावेळी भाविकांची प्रचंड गर्दी पहायला मिळते.
नंदीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. दुसऱ्या दिवशी महानैवैद्य, महाप्रसाद आणि त्यानंतर होणारी निरोपाची मिरवणूक झाल्यानंतर यात्रा सोहळा संपन्न होतो. देवीच्या दर्शनाने सुखावलेले भाविक आनंदाने, समाधानाने परतीचा मार्गावर रवाना होतात. यात्रेसाठी एसटीमहामंडळाकडून जादा गाडयांची सुविधा केली जाते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून यात्रेकरूनसांठी प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. पोलीस प्रशासनाकडूनही यात्रास्थळी चोख बंदोबस्त ठेवला जातो.
हेही वाचा :