

बेळगाव : 'उदं गं आई उदं'च्या गजरात सौंदत्ती येथील रेणुका देवीची शाकंभरी यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेला आठ ते नऊ लाख भाविकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे प्रशासनावर ताण पडला होता. देवीच्या दर्शनासाठी भाविकांना सुमारे दोन तास वेळ लागत होता. विविध भागांतून भाविक वाहने घेऊन मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
कर्नाटकबरोबरच महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेशमधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका देवीच्या शाकंभरी यात्रेचा आज मुख्य दिवस होता. पहाटे देवीच्या विशेष पूजनानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. एकाच वेळी 20 ते 25 हजार भाविक दर्शनासाठी रांगेत उभे राहत होते. जवळपास दोन कि.मी.पर्यंत ही रांग गेली होती. यात्रेसाठी गुरुवारीच चार लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. यामध्ये शुक्रवारी आणखी चार लाख यात्रेकरुंची भर पडली. यामुळे डोंगर फुलून गेला होता.