नाशिक : ज्योत दाखल; आजपासून चंदनपुरीत यात्रा | पुढारी

नाशिक : ज्योत दाखल; आजपासून चंदनपुरीत यात्रा

मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा
बानूबाईच्या श्रीक्षेत्र चंदनपुरीत श्री खंडेराव महाराज यात्रेची तयारी पूर्ण झाली असून शुक्रवार (दि.6) पासून भंडार्‍याची उधळण होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री खंडेराव महाराज व बाणाई मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. जेजुरीहून प्रज्वलित करण्यात आलेली मशालज्योत गुरुवारी (दि.5) चंदनपुरीत दाखल झाली. भंडार्‍याच्या उधळणीत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मशालज्योत घेण्यासाठी मंदिराचे पुजारी तुकाराम सूर्यवंशी, रामकृष्ण सूर्यवंशी, साहेबराव सूर्यवंशी, सदाशिव सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, राजेंद्र बेलन, बापू सोनजे, अनिल वाळके, नाना पुणतांबेकर, प्रभाकर सोनवणे, शरद सोनवणे, मंगलदास वाघ आदी युवक गेले होते.

चंदनपुरीची यात्रा ही 15 दिवस भरते. यंदा कमालीची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जय मल्हार ट्रस्ट व ग्रामपंचायतीतर्फे विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील कानाकोपर्‍यातील भाविकांची चंदनपुरीत वर्दळ होत असते. देवाचे मुखवटे सवाद्य मिरवणुकीने मंदिरात आणले जातात. ते पूजा – आरतीसाठी गाभार्‍यात ठेवले जातात. यात्रा संपल्यानंतर ते पुन्हा कौतिक अहिरे यांच्या घरी पोहोचविली जातात. ट्रस्टतर्फे भाविकांसाठी मंदिरासमोर ध्वनिक्षेपक यंत्रणा, सुलभ दर्शन होण्यासाठी रेलिंग, परिसरात नारळ फोडण्यासाठी सोय, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची फिल्टर योजना करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतर्फे गावात पथदीप, स्वच्छता व इतर कामे करण्यात आली आहेत. भाविकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन दिले जाते. मंदिराच्या गर्दीच्या काळात सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर राहणार आहे. सटाण्यातील देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रेतील खेळणी, पाळणे चंदनपुरीत दाखल झाले आहेत.

हेही वाचा :

Back to top button