म्हसा यात्रा विशेष : पौष पौर्णिमेला होतो म्हसोबाचा जागर; बैल खरेदी विक्रीचा उडतो धुरळा | पुढारी

म्हसा यात्रा विशेष : पौष पौर्णिमेला होतो म्हसोबाचा जागर; बैल खरेदी विक्रीचा उडतो धुरळा

४ लाखांवर भाविकांची असते हजेरी

म्हसा, (मुरबाड) : भाग्यश्री प्रधान आचार्य : माझ्या बैलाचा नादच खुळा, माझा बैल बघा कसा पांढरा शुभ्र, माझा बैल उंचपुरा.. अहो दादा माझाच बैल विकत घ्या हो , अहो ताई माझ्याकडे असणारी टोपली जास्त छान आहे घ्या की हो, असा आवाज आता शुक्रवारपासून १० दिवस मुरबाड येथे भरणाऱ्या म्हसा यात्रेत घुमू लागणार आहे.

कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनातील कप्प्यात यात्रा हा शब्द कोरलेला आहे. यात्रा संस्कृती ही जणू महाराष्ट्राची परंपरा आहे. यात्रेत केलेली मज्जा वर्षभर साठवून उत्साहाने पुन्हा पुढल्या वर्षी येणाऱ्या यात्रेची वाट बघितली जाते. अशीच एक यात्रा म्हणजे मुरबाड जवळ असणाऱ्या म्हसा या गावात भरणारी म्हसोबाची यात्रा.

म्हसा हे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील प्राचीन इतिहास असणारे गाव आहे. कर्जतपासून ४२ कि.मी. तर मुरबाडपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात म्हसोबाचे (भगवान शंकर) प्राचीन मंदीर आहे, या मंदिरावरून गावास म्हसा हे नाव पडले.
गुरूंच्या खरेदी विक्रीसाठी ही यात्रा विशेष प्रसिद्ध आहे. येथील गुरूंच्या बाजाराला सुमारे सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा आहे. विशेष म्हणजे या यात्रेला इंग्रजांनी देखील मान्यता दिली होती.

या यात्रेत गुरे खरेदीसाठी येथे तुफान गर्दी असते. पौष पौर्णिमेपासून मंदिराच्या सभोवती दहा दिवस ही यात्रा भरते. जवळपास २०० ते २५० एकर जमिनीवर गुरांची रांग उभी असते. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, गुजरात आणि देशातील विविध राज्यातील भाविक यात्रेकरू दरवर्षी गुरे खरेदीसाठी येथे येतात, पौष वद्य प्रतिपदेला गुरांची विक्री सुरू होते. यात्रेत कपडे, मिठाई, बर्फी, खेळणी, घोंगड्या, सोलापुरी चादरी, खाजा, पेढे आदींची दुकाने मोठय़ा प्रमाणात असतात. थंडीच्या दिवसात यात्रा येत असल्याने घोंगड्या, ब्लँकेट, स्वेटर, चादरींची शेकडो दुकाने येथे मांडलेली असतात. यात्रा काळात विविध प्रकारचे स्टॉल्स, सर्कस, मौत का कुआ, जायंट व्हील, फुगेवाले अशा छोट्या व्यावसायिक मोठ्या संख्येने होते. या बाजारात काही कोटींची उलाढाल होते.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील तमाशाचे फड?

दरवर्षी तमाशाचे फड या यात्रेत सहभागी झालेले दिसतात. मात्र गेली दोन वर्ष कोरोना असल्यामुळे ही यात्रा भरली नाही. त्यामुळे यावेळी या यात्रेत तमाशाचे फड असणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे.

यात्रेसाठी वाहतुकीत बदल

मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील म्हसोबा देवस्थानची यात्रा ८ ते १० दिवस असते. म्हसा यात्रेकरीता ठाणे, नगर, रायगड, पुणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक आणि इतर जिल्ह्यातून सुमारे ४ ते ५ लाख भाविक आणि यात्रेकरू येत असतात. यात्रेचे मुख्य ठिकाण मुरबाड कर्जत राज्यमार्ग क्रमांक ७९ वरील मौजे म्हसा हे आहे.

मुरबाड म्हसामार्गे कर्जत हा रस्ता वर्दळीचा असून कर्जत, पुणे, पनवेलकडे जाण्यासाठीचा जवळचा रस्ता आहे. या रस्त्याने अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. यात्रा कालावधीमध्ये भाविक देखील या मार्गाने खासगी वाहनांनी प्रवास करीत असल्याने भाविक यात्रेकरूंच्या वाहनांची देखील गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे यात्रा कालावधीत यात्रेकरूंना कोणताही धोका, अडथळा किंवा त्यांची गैरसोय होऊ नये व परिणामी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचे ग्रामीण पोलीस यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

यात्रेला फार मोठ्या संख्येने भाविक येतात. भाविकांच्या सोईसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे. वाहतूक व्यवस्थेतही बदल केलेले आहेत. – संदीप आवारी, तहसीलदार, मुरबाड

असे आहेत वाहतूक बदल

म्हसा यात्रेच्या निमिताने ५ ते १५ जानेवारी या दरम्यान मुरबाड येथील म्हसा नाक्यावरून म्हसा व कर्जतकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी ही जड वाहने मुरबाड बारवी डॅम बदलापूरमार्गे वळविण्यात येणार आहेत. तसेच कर्जतकडून म्हसा कडे येणारी जड वाहनांची वाहतूक बाटलीची वाडी येथून बंद करून ती कुळगांव बदलापूर मार्गे वळविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ग्रामीण पोलीस यंत्रणेला सूचित केले असल्याची माहिती तहसीलदार संदीप आवारी यांनी दिली.

यात्रेची वैशिष्ट्ये १. म्हसा यात्रा गुरूंच्या बाजारासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. हा बाजार जवळपास अडीचशे एकर जागेवर भरतो. २. यात्रेसाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक येथून भाविक येतात. ३. गुरूंच्या बाजाराला किमान २०० वर्षांपेक्षाही जुनी परंपरा आहे.

Back to top button