सांगली : जतला सहा टीएमसी पाणी देणार | पुढारी

सांगली : जतला सहा टीएमसी पाणी देणार

जत : पुढारी वृत्तसेवा

तुबची-बबलेश्वर योजनेतून जतला देण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याचे पत्र कर्नाटकने महाराष्ट्र जलसंपदा विभागाला दिले आहे. त्यामुळे 65 वंचित गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ योजनेसाठी वारणा खोर्‍यातून सहा टीएमसी पाणी उपलब्ध केले आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन ही योजना लवकर मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.

संख (ता. जत) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, सोलापूर रेल्वे बोर्डाचे
सदस्य प्रकाश जमदाडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब, माजी नगरसेवक भैय्या कुलकर्णी यांच्या समर्थकांसह सोसायटीचे अध्यक्ष, सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, लालासाहेब यादव, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, देयगोडा बिरादार, ज्येष्ठ नेते सिद्धूमामा शिरसाड , तालुकाध्यक्ष रमेश पाटील, माजी सभापती सुरेश शिंदे, कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा डॉ. गीता कोडग, निगडी सोसायटीचे अध्यक्ष बाळकृष्ण शिंदे ,योगेश व्हनमाने , मच्छिंद्र खिलारे , सुनील साळे, सुभाष बसवराज पाटील, सरपंच अण्णासाहेब कोडग उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी जलसंपदा हे खाते घेतले आहे. या तालुक्यातील जनता मला मंत्री म्हणून नव्हे; तर राजारामबापू पाटील यांचा मुलगा म्हणून ओळखते. राजारामबापू यांनी पाणी प्रश्न सुटावा म्हणून सांगली ते उमदी अशी पदयात्रा काढली होती. तालुक्यातील 65 गावांसाठी सहा टीएमसी पाणी पाणी उपलब्ध करून दिले आहे. ही योजना होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी असंख्य प्रामाणिक नेत्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या सर्वांचे मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने स्वागत करतो.

प्रकाश जमदाडे म्हणाले, मी भाजपमध्ये असतानाही मंत्री पाटील यांच्याकडे तालुक्यातील विविध प्रश्न घेऊन जात होतो. त्यावेळी त्यांनी कधीही पक्षसंघटना पाहिली नाही.1971 पासून गुड्डापूर साठवण तलावाचा प्रश्न प्रलंबित होता. मंत्री पाटील यांनी अर्थमंत्री असताना तो प्रश्न सोडवला. तालुक्यातील रखडलेल्या अनेक तलावांचे प्रश्न त्यांनी सोडवले आहेत.
जमदाडे यांनी यावेळी मागण्या मांडल्या.

त्या अशा ः विस्तारित म्हैसाळ योजनेला तातडीने गती द्यावी. उत्तर भागातील बेवनूर, नवाळवाडी, वाळेखिंडी या गावांचा टेंभू उपसा सिंचन योजनेत समावेश करावा. नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, जत येथे तहसीलदारांची तातडीने नियुक्ती करावी. संख येथे अप्पर तहसीलदार कार्यालय आहे, पण तिथे कर्मचारी संख्या कमी आहे. तसेच अप्पर तहसीलदार पदावर तातडीने अधिकार्‍यांची नियुक्ती करावी.

बसवराज पाटील, मन्सूर खतीब, भैय्या कुलकर्णी यांनी तालुक्यातील पाणीप्रश्नासह शहरातील पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली.

 

Back to top button