सातारा : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका सलग चौथ्यांदा अव्वल; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान | पुढारी

सातारा : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका सलग चौथ्यांदा अव्वल; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

कराड : पुढारी वृत्तसेवा : शहर स्वच्छता, सौंदर्यीकरणावर दिलेला भर, मुख्याधिकारी, आरोग्य कर्मचार्‍यांनी झोकून केलेले काम, नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद यामुळे यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशातील सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदा गटात कराड नगरपरिषद पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पोहोचली आहे. एक ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा बक्षीस वितरण देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यासाठीचे निमंत्रण कराड नगर परिषदेला प्राप्त झाले आहे.

शहरातील ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेला सीएसटीपी प्लांट, शहरातील सौंदर्यीकरणासाठी केली जाणारी कलात्मकता, टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर व कचर्‍याचे योग्य नियोजन या बाबी स्पर्धेत महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. सलग चार वर्षे नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सातत्याने अव्वल राहिली आहे. या स्पर्धेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, अभियंता ए. आर. पवार, पालिकेचे वरिष्ठ मुकादम मारुती काटरे, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांनी झोकून देवून काम केल्याने देशात कराड नगरपरिषद अग्रक्रमाने स्पर्धेत अव्वल राहिली आहे.

दिल्ली येथे २९ व ३० सप्टेंबर रोजी देशातील अव्वल ठरलेल्या नगरपरिषदांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत केलेल्या कलाकृती तसेच राबविलेले उपक्रमावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन केले असून कराड नगरपालिका या प्रदर्शनात भाग घेणार आहे. दोन दिवसांच्या प्रदर्शनानंतर एक आक्टोंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button