सातारा : मोदी गोरेंना म्हणालेत का, रामराजेंना घोडा-बैल म्हण ? : आ. रामराजे निंबाळकर | पुढारी

सातारा : मोदी गोरेंना म्हणालेत का, रामराजेंना घोडा-बैल म्हण ? : आ. रामराजे निंबाळकर

सातारा; पुढारी वृत्तसेवा : गेले काही दिवस आ. जयकुमार गोरे हे तुमच्यावर टीका करत आहेत? असे विचारले असता आ. रामराजे म्हणाले, ते एका राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी काय बोलावे हे तुम्ही आणि मी काय ठरवणार? मोदी साहेबांनी त्यांना जो अजेंडा दिला आहे तो ते राबवत असावेत. मोदी गोरेंना म्हणालेत का, रामराजेंना घोडा-बैल म्हण? रामराजेंना पाडूनच हिंदुत्वाचा अजेंडा त्यांना राबवायचा असेल म्हणून ते बोलत असतील, असे रामराजे म्हणाले. तुम्ही मध्यंतरी एक राजकीय स्टेटस ठेवला होता त्याबद्दल काय सांगाल? असे विचारले असता स्टेटस हे स्टेटस असते, ते 24 तासासाठी असते. ते कोणाला झोंबले हे माहित नाही. ईडी कारवाईबाबत विचारले असता आ. रामराजे म्हणाले, ईडीची कारवाई आता तर झाली नाही ना? होईल तेव्हा पाहू, असा टोलाही त्यांनी आ. गोरेंना लागवला.

राज्य आणि केंद्र सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू आहे. आगामी कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमकपणे जिल्ह्यात विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवणार आहे. जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक आमदार मतदारसंघनिहाय बैठका व दौरे घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. रामराजे ना. निंबाळकर, प्रतोद आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील व आ. मकरंद पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

आ. रामराजे म्हणाले, सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकत आहेच. आमदार कमी असले तरी सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी आम्ही दरवेळी बैठका घेत असतो. पुढील काही दिवसात पक्ष बांधणीसाठी तालुकानिहाय दौरे काढण्यात येणार आहेत. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, नव्या सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून आक्रमक भुमिका मांडणार आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीसह जेवढ्या निवडणूका लागतील त्या एकत्रीतपणे, सामुदायिकपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुका व राष्ट्रवादी पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. सातारा किंवा पाटण मतदारसंघात कोण उमेदवार असेल असे विचारले असता ज्या वेळेस निवडणूक येईल त्यावेळी ते ठरवले जाईल असे आ. बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

आ. मकरंद पाटील म्हणाले, ग्रामपंचायत व नगरपंचायतीचे निकाल पाहिले असता जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येते. जिल्ह्यातील जनता कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे हेही दिसून येते. संघटना वाढीबाबत प्रत्येक मतदारसंघात बैठका व दौरे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सोळशीच्या कार्यक्रमात नेमकं काय झालं अचानक बैठक घेण्याचे कारण काय? असे विचारले असता आ. शिंदे म्हणाले, अचानक बैठक घेणं हे म्हणणं चुकीचे आहे. अगोदरच आम्ही आ. रामराजेसह अन्य पदाधिकार्‍यांनी बैठक घ्यायचे ठरवले होते. मध्यतंरीच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाल्याने ते दौरे पुढे ढकलले होते.

खेड ग्रामपंचायतीत पराभव का झाला असे विचारले असता? असे विचारले असता आ. शिंदे म्हणाले, खेड ग्रामपंचायतीमध्ये आम्ही चांगले उमेदवार उभे केले होते, ते निवडून येतील अशी अपेक्षा होती. सध्याच्या राजकारणामध्ये ज्या पध्दतीने ती निवडणूक झाली त्यात आम्ही कमी पडलो. यामध्ये दुरूस्त्या कशा करायच्या? याचा बोध आम्ही घेतला आहे. संभाजीनगर ग्रामपंचायतीमध्ये आम्ही अवघ्या 7 दिवसात 6 उमेदवार उभे केले होते त्यातील दोन उमेदवार निवडून आले आहेत. फक्त 100 ते 125 मताने काही जागा गेल्या आहेत. 17 च्या 17 जागा उभ्या केल्या असत्या तर त्या निवडून आल्या असत्या. निवडणूक झाली, पराभव झाला यावर जास्त काही बोलणे उचित नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होतो ही अनेक वर्षांची परंपरा आहे. ते त्यांचे शक्तीस्थळ असून त्यांना संधी न देण्याचा प्रयत्न होणं हे चुकीचे होते. खा. शरद पवार, अजितदादा पवार यांच्यासह सर्वजण सांगत होते त्यांना त्या ठिकाणी अधिकार मिळाला पाहिजे. परंतु, जाणीवपूर्वक शिवसेनेला अडवण्याचा प्रयत्न केला. शेवटी न्याय देवतेने तो न्याय दिला. न्यायदेवता आजही जिवंत आहे त्याबद्दल मला विश्वास असल्याचे आ. शशिकांत शिंदे म्हणाले.

Back to top button