रत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणाला 20 वर्षे सक्तमजुरी | पुढारी

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणाला 20 वर्षे सक्तमजुरी

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : लांजा परिसरातील अल्पवयीन 14 वर्षीय मुलीशी ओळख करून तिचा गैरफायदा घेत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती करणार्‍या आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी 20 वर्ष सक्तमजुरी आणि 24 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अक्षय शिवाजी गवड (23, मुळ रा. बादेवाडी पन्हाळा, कोल्हापूर सध्या रा. लांजा, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने लांजा येथील अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिच्याशी मे 2020 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनी पीडितेला त्रास जाणवू लागल्याने तिच्या आईने तिला लांजा येथील खासगी डॉक्टरकडे नेले होते. परंतु, तिचा त्रास वाढल्याने तिच्या आईने तिला अधिक उपचरांसाठी कोल्हापूरला नेऊन तेथे तिची सोनोग्राफी करण्यात आली. त्यात ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने पुढे कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला. दरम्यान, पीडितेच्या आईने या बाबत आरोपी अक्षय गवड विरोधात कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु, हा गुन्हा लांजा येथे घडल्याने हा गुन्हा लांजा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी लांजा पोलिसांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला न्यायालयात सुरु होता. शुक्रवारी या खटल्याचा निकाल देताना पोक्सो विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांनी 18 साक्षीदार तपासून केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीला भा. दं. वि. कलम 376 तसेच पोक्सो कायदा कलम 4,6,8,10 अन्वये दोषी ठरवून 20 वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्याचा लांजा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल गंभीर आणि पोलिस निरीक्षक श्वेता पाटील यांनी तपास केला. तसेच पैरवी अधिकारी म्हणून कदम यांनी काम पाहिले.

Back to top button