सातारा : काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत संसार थाटून ठाकरे कुटुंबीयांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली : आमदार शंभूराज देसाई | पुढारी

सातारा : काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत संसार थाटून ठाकरे कुटुंबीयांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली : आमदार शंभूराज देसाई

कराड; पुढारी वृत्तसेवा : आम्ही गद्दारी केलेली नाही. ठाकरे कुटुंबियांनी अडीच वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून संसार केला आणि आम्हालाही सोबत बसवले. ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होती. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार जोपासत आहे, अशा शब्‍दातआमदार शंभूराज देसाई यांनी टीकेला प्रत्‍युत्तर दिले. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील मल्हारपेठ येथील सभेत आमदार शंभूराज देसाई यांना गद्दार म्हणत जोरदार टीका केली होती.

आदित्य ठाकरे यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात घेतलेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटणकर गटाचे बळ होते; पण पाटणकर गटाचे कार्यकर्ते शिवसेनेचा भगवा कधीच घेणार नाहीत, सभेला कॉन्ट्रॅक्ट बेसवर गर्दी केली होती, असा आरोपही आमदार देसाई यांनी केला.

दगडू सकपाळ यांच्या टीकेला प्रत्‍युत्तर देताना देसाई म्हणाले की, सकपाळ २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर उभे राहिले होते. त्यांना केवळ 22 ते 23 हजार मते मिळाल्याने ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. स्वतःच्या मतदारसंघात 22 ते 23 हजार मते मिळवणारे माझ्या मतदारसंघात येऊन मला आव्हान देत आहेत, हे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सभेत एका कार्यकर्त्याने माझ्यावर एकेरी शब्दात टीका केली; पण पदासाठी तो एका पक्षात आणि त्याची पत्नी एका पक्षात आहेत, अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल कदम यांच्यावर नाव न घेता देसाई यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button