

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करणाऱ्या लोकांना देखील चौकशीसाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विविध ठिकाणाहून शिवसैनिकांची धरपकड सुरु केल्याची देखील माहिती आहे.
या प्रकरणात अटक केलेल्या सहा जणांना 6 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. याशिवाय खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यावेळी सामंत यांच्या गाडीची काच फुटली. हा प्रकार कात्रज चौकात घडला. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी काच फोडली याचा अभिमान असल्याचे सांगितले. आमदार उदय सामंत सासवड, नंतर हांडेवाडी येथील कार्यक्रम उरकून ते कात्रज चौकात आले असता त्यांच्या गाडीवर हल्ला झाला.