मुंंबई : बनावट नोटा बनविणारी कर्नाटकची टोळी गजाआड | पुढारी

मुंंबई : बनावट नोटा बनविणारी कर्नाटकची टोळी गजाआड

मुंंबई; पुढारी वृत्तसेवा :  बनावट नोटा चलनात आणणार्‍या कर्नाटकमधील एका तरुणाला दादर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून 100 रुपयांच्या बारा बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्याच्या कर्नाटकातील दोघा साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.

एक व्यक्ती गेल्या दोन दिवसांपासून परळ एसटी बस डेपो परिसरात बनावट नोटा खर्‍या असल्याचे भासवून चलनात आणण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यांनी सापळा रचून एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये हा तरुण कर्नाटकमधील गुलबर्गाचा रहिवाशी असल्याचे समजले.

आनंदकुमार ममदापूर (29) असे त्याचे नाव आहे. पोलिसांना अगझडतीमध्ये त्याच्या खिशात 100 रुपयांच्या 12 बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी या नोंटांबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता कर्नाटकमधीलच शिवकुमार शंकर उर्फ शिवु (38) नावाच्या व्यक्तीने दिल्याचे सांगितले. अखेर पोलिसांनी याप्रकरणी सरकार तर्फे फिर्याद नोंदवत दोन्ही आरोपींविरोधात  गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला.

पोलीस पथकाने आनंदकुमार याच्या वास्तव्याच्या ठिकाणावरुन आणखी 100 व 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्यानंतर पोलीस पथकाने कर्नाटकमधील हुमनाबाद येथे जाऊन शिवकुमार याच्यासह त्याचा साथीदार किरण कांबळे (28) यालाही अटक केली.

Back to top button