शेअर मार्केटच्या आमिषाने साडेसात लाखांची फसवणूक; एकाला अटक | पुढारी

शेअर मार्केटच्या आमिषाने साडेसात लाखांची फसवणूक; एकाला अटक

साखरवाडी पुढारी वृत्तसेवा : शेअर बाजारामध्ये पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून होळ येथील एकाला सुमारे साडेसात लाखाला गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी साखरवाडी येथील एकाला अटक केली आहे.

पांडुरंग दत्तात्रय चव्हाण (वय 41, रा. साखरवाडी, ता. फलटण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी विक्रम जगन्नाथ भोसले (रा. होळ, ता. फलटण) यांचा संशयिताने विश्‍वास संपादन करुन त्यांना शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवलेल्या पैशाचे डब्बल रक्कम करुन देतो, असेही सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून गुगल पे वरुन वेळोवेळी सुमारे 7 लाख 66 हजार 500 रुपये पाठवले.

मात्र गुणतवलेली रक्कम व त्याची डब्बल रक्कम परत न करता संशयिताने ती देण्यास टाळाटाळ केली. वारंवार पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. दरम्यान, याचवेळी तक्रारदार यांच्यासह मच्छिंद्र मोरे, सचिन भाकरे (दोघे रा. साखरवाडी), बळीराम होडशीळ (रा. गीतेवाडी, ता. जामखेड), ऋषीकेश भांगे (रा. बीड) यांचीही लाखो रुपयांची संशयिताने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताला अटक केली. संशयिताला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पोनि धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत.

हेही वाचा

Back to top button