राज्यातील सत्ता नाट्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांची एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट | पुढारी

राज्यातील सत्ता नाट्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांची एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

सातारा, हरिष पाटणे : राज्यातील अभूतपूर्व सत्ता नाट्यात आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची एन्ट्री झाली आहे.आज मुंबईत सागर बंगल्यावर जाऊन उदयनराजे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे आधीच अभिनंदन केले. कुणाच्या धमक्यांना घाबरु नका. कुणी धमक्या दिल्या तर मला सांगा मी आहेच, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. संघर्षाच्या लढाईत देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी हुकमी एक्का बाहेर काढला असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उलटली आहे.

काल (दि. २४) मध्यामांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बंडखोरांना परिमाण भोगावे लागतील. त्यांना मुंबईत यावे लागणारच आहे. तेव्हा त्यांच्या सोबत भाजपचे कोण असणार आहे? असे विधान केले होते. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिले होते. धमक्या देऊ नका, आमदारांना काही करायचा प्रयत्न झाला तर घर गाठणे मुश्किल होईल, असे राणे म्हणाले.
मात्र या विधानाने राणेच जास्त ट्रोल झाले. सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही चॅलेंज आहे मुंबईत या असे विधान केले. शिवसेना रस्त्यावरच्या लढाईला तयार झाली असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सागर बंगल्यावर जाऊन भाजपचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम अभिनंदन माझ्याकडून असे म्हणत उदयन राजे यांनी फडणवीसांना शाल पांघरली, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही लढा अशा शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.

फडणवीस यांना भेटून आल्यावर उदयन राजे यांनी आपले आक्रमक इरादे व्यक्त केले. ते म्हणाले, हे गठबंधन अनैसर्गिक होते ते तुटणारच होते. सरकार पडले आहे. कुणी ही धमक्या देऊ नयेत. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांची आहे. धमक्यांना भीक घालणार नाही. कुणाला धमक्या आल्या तर मला सांगा, मी आहेच, असा इशारा दिला.

भाजप व बंडखोर शिंदे गटाच्या बाजूने उदयनराजे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. राज्यात सत्ता संघर्ष टिपेला पोहोचला आहे. रस्त्यावरची लढाई होण्याची चिन्हे आहेत .अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अचूक टायमिंग साधले आहे. राज्यभर लोकप्रिय असलेल्या व मास लीडर म्हणून ओळख असलेल्या छत्रपती उदयनराजे यांना त्यांनी या लढाईत मैदानात आणले आहे. त्यामुळे या सत्ता नाट्याला धार चढणार आहे.

Back to top button