शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना आव्हान | पुढारी

शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना भवनात आज शिवेसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी राज्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधत भाजपने डाव साधल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, भाजपसोबत जायला काहींचा दबाव आहे. शिवसेनेशी बंडखोरी केलेले आणि आपल्याला सोडून जे गेले ते माझे कधीच नव्हते. शिवसेनेची मुळं माझ्या सोबत आहेत. मला सत्तेचा मोह नाही. मी मुख्यमंत्री पद आताही सोडायला तयार आहे, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, मी शांत आहे. षंढ नाही. स्वप्नात देखील विचार केला नव्हता की शिवसेनेचे आमदार बंड करून पाठीवर वार करतील. काही आमदारांनी धोका दिला. वर्षा निवासस्थान सोडलं म्हणजे मी जिद्द सोडली असं होत नाही. माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडावरची फुलं, फांद्या नेली तरी त्याचे मूळं मात्र नेऊ शकत नाही. ती मूळं नेहमीच माझ्यासोबत असतील. जे सोडून गेले त्यांचं मला वाईट वाटत नाही. काही चर्चा अशाही सुरू आहेत की, हा मास्टर प्लॅन आहे. पण आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेन?, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला.

मी बरा होऊ नये म्हणून काही जण पाण्यात देव ठेवून बसले आहेत. मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले आहेत. बंडखोरांनी शिवसेना फोडण्याचं पाप केलं आहे. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या बंडखोर आमदारांनी दिले.

विरोधकांवर जोरादार टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करायचा प्रयत्न केला जात आहे. सेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते ही दाखवण्याची वेळ आली आहे. मला वीट आलाय, म्हणजे मी वीट त्यांच्याच डोक्यात हाणणारच, असा हल्लाबोल केला.

एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं? असा सवाल उपस्थित करत त्यांना नगरविकास खातं दिलं. माझ्याकडची दोन खाती त्यांना दिली. संजय राठोडांवर वाईट आरोप होऊनही मी त्यांन सांभाळून घेतलं. विठ्ठल-बडव्यांवर जे बोलत आहेत, त्यांचा पोरगा खासदार आहे. मग माझ्या मुलाने काम करायचंच नाही का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला.

हे सगळे भाजपने केलंय. बंडखोरांना जर त्यांच्यासोबत भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. मी लायक नसेन तर पक्ष प्रमुखपदही सोडायला तयार आहे. मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी गौण. बाळासाहेबांसाठी माझ्याहून लाडकं अपत्य म्हणजे शिवसेना होतं, अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सत्ता येते-जाते, आकडे असले-नसले तरी मुख्यमंत्र्यांनी काम केलं. कुटुंबप्रमुखाला धोका देता याचं वाईट वाटतं, अशी भावना व्यक्त केली.

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा चौथा दिवस आहे. शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शिंदे गट आपल्या मागण्यांवर ठाम असून उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या इतर नेत्यांकडून बंडखोर आमदारांना मुंबईत येऊन चर्चा करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, या आवाहनला शिंदे गटाने नकार दिला. तसेच, कालपासून शिवसेनेतील आणखी काही आमदार शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे सध्या शिंदे गटात ४० हून अधिक शिवसेना आमदार आणि १० हून अधिक अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. आता यापुढे काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button