कराड; पुढारी वृत्तसेवा: वाघ व बिबट्यांच्या नख्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना वन विभागाने अटक केली. तस्करी करणाऱ्या दोघांना कराडात सापळा रचून सोमवारी दुपारी ही कारवाई केली. संशयितांकडून ११ नख्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. संशयितांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दिनेश बाबुलालजी रावल (वय ३८) व अनुप अरुण रेवणकर (वय ३६, दोघेही रा. कराड) अशी वन विभागाने कारवाई केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाघ व बिबट्या यांच्या नख्यांची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी कराडमधील कृष्णा नाका परिसरात सापळा लावला.
वन विभागाने दिनेश आणि अनुप याच्यांकडे बोगस ग्राहक बनवून एकाला पाठवले. ग्राहक आणि दोघांच्यात याबाबत चर्चा सुरू असताना वन विभागाने रंगेहाथ पकडून त्यांना ताब्यात घेतले. वनविभागाने लावलेल्या सापळामध्ये दोघेजण अडकले. त्यांच्याकडून वाघ व बिबट्यांची एकूण ११ नखे अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.
संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
जिल्ह्यातील ही मोठी कारवाई असून यामध्ये आंतरराज्य टोळीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही संशयितांनी अनेक कारनामे केल्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनरक्षक महेश झांजुरणे, वनक्षेत्रपाल तुषार नवले व वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचलंत का?