मुंबई मोनोरेल सीईओ डॉ. डी. एल. एन. मुर्ती एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

मुंबई मोनोरेल सीईओ डॉ. डी. एल. एन. मुर्ती एसीबीच्या जाळ्यात

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई मोनोरेल सीईओ डॉ. डी. एल. एन. मुर्ती यांच्याविरोधात २० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. कंत्राट कंपनीने केलेल्या कामांच्या मंजूर आणि प्रलंबित बिलाची रक्कम अदा करण्यासाठी मोनोरेल सीईओ (CEO)  एल. एन. मूर्ती यांनी २० लाखांची मागणी केली होती. त्यानुसार आता एसीबी याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार याची फॅसिलिटी मॅनेजमेंटची कंपनी आहे. या कंपनीला मुंबई मोनोरेल या प्रकल्पाअंतर्गत साफसफाई, हाऊसकिपिंग, मेंटेनन्स, कस्टमर सर्व्हिस असोसिएशट या संदर्भात जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंतचे कंत्राट मिळाले होते.

कंपनीने कंत्राटाप्रमाणे काम पूर्ण केले. मात्र या कामाचे ०२ कोटी ५० लाख रुपयांचे बिल आणि बँक गॅरेंटी म्हणून ३२ लाख रुपये देणे बाकी होते.

वारंवार पाठपुरावा केल्यानंतर मुंबई मोनोरेलकडून फेब्रुवारी आणि मार्च २०२१ मध्ये कंपनीला ०२ कोटी १० लाखांचे बिल देण्यात आले.

त्यानंतर जून २०२१ मध्ये बँक गॅरेंटीच्या रकमेतील २२ लाख रुपये देण्यात आले.

कंपनीला ५० लाख येणार असताना लाचेची मागणी

मात्र कंपनीला अजून ५० लाख रुपये मुंबई मोनोरेलकडून येणे बाकी होते. ही फाईल मूर्ती याने आपल्याकडे अडकवून ठेवत तक्रारदार यांच्याकडे २० लाखांची मागणी करण्यात सुरुवात केली.

पैशांची मागणी करण्यात आल्याने तक्रारदार यांनी एसीबीचे मुख्यालय गाठून तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने केलेल्या पडताळणीमध्ये मूर्ती हा लाच म्हणून पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे उघड झाले.

अखेर एसीबीने त्याच्या विरोधात लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास आणि कारवाई सुरु केली आहे.

Back to top button