पुण्यात कार्यकर्त्यांनी उभारले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर | पुढारी

पुण्यात कार्यकर्त्यांनी उभारले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर

औंध; पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने औंध गाव येथे ॲड. मधुकर मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर मुंडे आणि कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले आहे. या मंदिराचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा ॲड. मधुकर मुसळे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते पार पडला.

या प्रसंगी ॲड. मधुकर मुसळे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाप्रती योगदान फार मोठे आहे. त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयामुळे आज भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानबिंदू प्राप्त झाला आहे.

त्यांच्यामुळेच काश्मीरमध्ये प्रत्येक शाळेमध्ये अभिमानाने भारतीय तिरंगा फडकत आहे. अशा आदर्श व्यक्तिमत्त्वाचे आचार-विचार जोपासले जावे. त्यांच्या कार्याला नतमस्तक व्हावे, त्यांचे काम हे पूजनीय आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर उभारले आहे.

या वेळी के के नायडू, केसारामजी परिहार, शेखर विघ्ने, ओमारामजी चौधरी, मिलिंद कदम, आशुतोष देशपांडे, अक्षय सांगळे, संकेत सांगळे, वेलारामजी चौधरी, विनय शामराज आदी उपस्थित होते.

पहा व्हिडिओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले, टायर पकडून चालले होते लटकत 

Back to top button