या 5 धोकादायक गावांबाबत शासन उदासीन; सर्वेक्षण झाले, मात्र पुनर्वसन नाही | पुढारी

या 5 धोकादायक गावांबाबत शासन उदासीन; सर्वेक्षण झाले, मात्र पुनर्वसन नाही

अशोक शेंगाळे

भीमाशंकर : माळीण घटनेनंतर शासनदरबारी धोकादायक ठरलेल्या 5 गावांबाबत अद्यापही शासन उदासीन भूमिकेत आहे. या पाच गावांमध्ये काळवाडी (जांभोरी), बेंढारवाडी (पोखरी), मेघोली (माळीण), पसारवाडी, भगतवाडी (फुलवडे) यांचा समावेश असून, कोणतीही ठोस पुनर्वसन योजना या गावांसाठी एका तपानंतरदेखील राबविण्यात आलेली नाही. काळवाडी (जांभोरी), बेंढारवाडी (पोखरी), मेघोली (माळीण), पसारवाडी, भगतवाडी (फुलवडे) या परिसरातील गावांमध्ये नवीन नियोजित जागेची पाहणी करण्यात आली. यासाठी भुगर्भशास्त्रज्ञांनी सर्वेक्षण केले.

गावकऱ्यांसाठी नियोजित जागेची मोजणीदेखील झाली आहे. गावकऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आधिकारी व पदाधिकारी हे सन 2014 पासून प्रत्येक वर्षी सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात अजून काहीही केलेले नाही, हे विशेष. गावकऱ्यांशी चर्चा करून अडचणी समजून घेण्यात आलेल्या आहेत. नियोजित जागेत ग्रामस्थांना सुखसुविधा देण्याबाबत, निवास व शेती करणे सोईचे होईल, असा दृष्टिकोन आहे. यातच या गावांच्या पुनर्वसनासाठी वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

दुसरी माळीण होण्याची वाट बघायची का?

अनेक वर्षांपासून नुसत्या पाहण्या व गावबैठका झाल्यात. परंतु, ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे गेली 9 वर्षे दुर्लक्षित झाल्याने अनेकवेळा पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी येथील गावकर्‍यांना तातपुरते हलविण्यात येते. असे किती दिवस करणार की दुसरे माळीण होण्याची वाट पाहत राहणार, असा प्रश्न गावकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

जागा उपलब्ध असूनही टाळाटाळ

काळवाडी (जांभोरी), बेंढारवाडी (पोखरी), मेघोली (माळीण) आणि पसारवाडी या गावांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. मेघोली गावात 15 घरकुले व अंगणवाडी इमारत मंजूर असून, फक्त भूखंड पाडून ते वितरित करणे आवश्यक आहे. घरकुलाची रक्कम तुटंपुजी असून, सीएसआर फंडातूनही मदतीची गरज असल्याची मागणी या लोकांनी वारंवार केली आहे.

Back to top button