सातारा : दोन वर्षांत अब तक कराडात गुंडांना दणका; 6 टोळ्यांसह 9 तडीपार | पुढारी

सातारा : दोन वर्षांत अब तक कराडात गुंडांना दणका; 6 टोळ्यांसह 9 तडीपार

कराड : अमोल चव्हाण
कराड शहर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचा विडा उचलला आहे. त्यानुसार पोलीस कारवाई करत असून पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांना मोठा दणका दिला आहे. केवळ गत दोनच वर्षात सहा गुन्हेगारी टोळ्यांसह नऊ सराईत गुन्हेगार असे एकूण रेकॉर्डवरील 47 गुन्हेगारांना पोलिसांनी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

दमदाट, मारामारी, दगडफेक, जाळपोळ, सावकारी, खंडणी, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांवर पोलीस तडीपारीची कारवाई करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. पुढील कारवाई आपल्यावर होऊ नये यासाठी या कारवाईतून वाचलेले पण रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार धडपडत असून त्यांची चुळबूळ वाढली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी नुकतीच सातारमधील एक, कराड शहरातील दोन तसेच उंब्रज व पाटण येथील एक असे चार गुन्हेगारी टोळ्यांसह एकूण 23 गुन्हेगारांना तडीपार करत मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कराड नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर त्यांची बारीक नजर आहे. तसेच गुन्हेगारी क्षेत्रात नव्याने प्रवेश करणार्‍यांच्या हालचालीही पोलीस तपासत आहेत. त्यातूनच मग तडीपारीसारखी कारवाई केली जात आहे. गत दोन वर्षात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या सूचनांनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व यापूर्वीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी सराईत गुन्हेगारांची माहिती गोळा करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना दिला.

जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी या अहवालाचा विचार करून शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक राहावा या दृष्टीने गत दोन वर्षात सहा गुन्हेगारी टोळ्यांसह नऊ सराईत गुन्हेगार असे एकूण 47 गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहर व परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुरक्षितता अबाधित राहण्यास निश्चितच मदत होईल.

गुन्हेगारी टोळ्यांच्या मुळावर घाव…

रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा लेखाजोखा व त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून कायद्याच्या चौकटीत राहात गुन्हेगारी टोळ्यांच्या मुळावर कायदेशीर घाव घालणे ही हद्दपारीच्या कारवाईची वैशिष्ट्य मानावे लागतील. अशा कारवायांमधून गुन्हेगारांमुळे समाजामध्ये निर्माण झालेली असुरक्षितता बदलून कायद्याचे पालन करणार्‍या नागरिकांसाठी सुरक्षित व शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा पोलिसांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button