सातारा पोलिसांना आज अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मिळणार | पुढारी

सातारा पोलिसांना आज अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मिळणार

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या विषयी ‘अफजलाच्या औलादी, मी असल्या गादींच्या छत्रपतींना मानत नाही,’ असे वक्‍तव्य केल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात गुरुवारी सातारा पोलिसांना सदावर्ते यांचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात दि. 9 ऑक्टोबर 2020 रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात राजेंद्र बापूराव निकम (वय 42, रा. तारळे ता. पाटण, जि. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. तक्रारदार निकम यांनी मूळ तक्रारीत म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सहा वर्षांपासून मोठा लढा सुरू आहे. 2020 मध्ये मराठा समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे आरक्षण व इतर मागण्यांच्या अनुषंगाने बैठका होत होत्या. 7 ऑक्टोबर 2020 रोजी मराठा समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक कोल्हापूरचे खा. संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यावेळी मुंबई येथील एका वृत्तवाहिनीवर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ‘अफजलाच्या औलादी, मी असल्या छत्रपतींच्या गाद्यांना मानत नाही.’ अशा प्रकारे वक्‍तव्य करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा एकेरी उल्‍लेख करत मराठा समाजाचा अपमान होईल, असे वक्‍तव्य केले होते. या वक्‍तव्यामुळे तेढ निर्माण होईल व सार्वजनिक शांततेचा भंग होवून दंगली भडकतील, असे कृत्य असल्याचे तक्रारदार राजेंद्र निकम यांनी म्हटले आहे.

सातारा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गेल्या दीड वर्षांत अ‍ॅड. गुणरत्ने यांना सातारा शहर पोलिसांनी अटकच केली नाही. अशातच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावरील हल्‍ला प्रकरणी संशयित आरोपी म्हणून मुंबई पोलिसांनी अटक केली. बुधवारी त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना ऑर्थर जेलमध्ये ठेवण्यात आले. याचवेळी न्यायालयाने सातारा पोलिसांनी त्यांचा ताबा घ्यावा, असे म्हटले.

सातारा पोलिस बुधवारी मुंबईत तळ ठोकून होते. रात्री 9 वाजता याबाबत पोनि भगवान निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुंबईतील कोर्टाने सातारा पोलिसांकडे ताबा द्यावा, असे म्हटले आहे. मात्र त्याची रवानगी ऑर्थर जेलमध्ये करण्यात आली आहे. ताबा मिळण्यासाठी सातारा पोलिस रात्री उशीरा ऑर्थर रोड जेल गाठले. मात्र अद्याप ताबा मिळाला नसल्याचे सांगितले. रात्री उशीरा किंवा गुरुवारी सकाळी 10 वाजता त्याचा ताबा मिळेल, असेही पोनि निंबाळकर यांनी सांगितले.

सातारा पोलिसांचा हेवीवेट बंदोबस्त…

सातारा पोलिस ठाण्यात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते याच्याविरुध्द संवदेनशील गुन्हा दाखल असल्याने सातारा पोलिस तयारीनिशी मुंबईत दाखल आहेत. अ‍ॅड. सदावर्ते यांचा ताबा मिळाल्यानंतर व त्यांना सातार्‍यात आणल्यानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी पूर्ण फिल्डींग लावली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती पोनि निंबाळकर यांनी दिली.

हेही वाचलत का ?

Back to top button