डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाच्या आडनावाचा रंजक इतिहास; सकपाळ… आंबावडेकर आणि डॉ. आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाच्या आडनावाचा रंजक इतिहास; सकपाळ… आंबावडेकर आणि डॉ. आंबेडकर
Published on
Updated on

मंडणगड; विनोद पवार : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी झाला असला, तरी त्यांचे मूळ गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे आहे. आपल्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशीच त्यांची ओळख असली, तरी त्यांच्या या आडनावाचा रंजक इतिहास आहे. सकपाळ ते आंबेडकर असे हे आडनाव कसे बदलत गेले याचा इतिहास आंबडवे येथील ज्येष्ठ नागरिक सुदाम सकपाळ यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना उलगडला.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात तसेच स्वातंत्र्यानंतरदेखील भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना महत्त्वपूर्ण ठरली. आज सर्वत्र डॉ. आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना बाबासाहेबांच्या आडनावाची ही रंजक माहिती सकपाळ यांनी उलगडून सांगितली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वजांचे मूळ गाव आंबडवे हे होय. हा शोधदेखील एका ब्रिटिश अभ्यासकाने लावला. तोपर्यंत हे गावदेखील दुर्लक्षितच होते. आंबडवे येथील सकपाळ कुटुंबात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.

डॉ. आंबेडकरांचे वडील रामजी सकपाळ यांनी पुणे येथे आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सैन्यामध्ये ते शिक्षक म्हणून नोकरीला लागले. मुख्याध्यापक म्हणूनदेखील त्यांनी काम केले. 14 वर्षे सैन्यात काम सांभाळल्यानंतर मेजर (सुभेदार) म्हणून बढती मिळाली. नंतर ते महू (मध्य प्रदेश) येथे वास्तव्याला होते. महू हे 'मिलिटरी हेडक्वॉर्टर ऑफ वॉर' म्हणून ओळखले जात होते. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल रोजी जन्म झाला. भीमाईच्या पोटी जन्म घेणार्‍या पुत्राचे नाव 'भीम' असे ठेवण्यात आले. नंतर भीमचा भीमराव असा उल्लेख झाला. पुढच्या काळात लोक त्यांना बाबा संबोधू लागले आणि त्यानंतर ते सर्वांचे बाबासाहेब झाले. आईचे लहानपणीच निधन झाल्याने त्यांचा सांभाळ आत्यानेच केला.

बाबासाहेबांच्या आडनावाचा हा इतिहास सांगताना सकपाळ म्हणाले, सातारा येथील प्रतापसिंह शाळेत बाबासाहेबांचे आडनाव 'आंबावडेकर' असे 7 नोव्हेंबर 1900 रोजी नोंदविण्यात आले. त्यामुळेच हा दिवस आज शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा केला जात आहे. येथील शाळेमध्ये डॉ. आंबेडकरांचे नाव आणि नोंद केलेले रजिस्टरदेखील आजही पाहायला मिळते. आपल्या आंबडवे या गावाच्या नावावरून 'आंबावडेकर' असे आडनाव ते सांगत असत. त्यामुळे हेच नाव शाळेत प्रवेश घेताना नोंदविण्यात आले. कालांतराने सातारा येथे शिक्षण सुरू असतानाच बुद्धिमत्ता व प्रतिभेवर प्रेम करणार्‍या शिक्षकांना त्यांचे 'आंबावडेकर' हे आडनाव काहीसे खटकत होते. त्यानंतर त्यांचे शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी पुढच्या काळात डॉ. बाबासाहेब यांचे आडनाव 'आंबेडकर' असे नोंदविले आणि तेच पुढच्या कालावधीत प्रसिद्ध झाले. त्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी सकपाळ, आंबावडेकर या आडनावांपेक्षा आंबेडकर हेच नाव कायम ठेवले.

ते मंडणगडमधील आपल्या आंबडवे या मूळ गावी चुलत भावाच्या विवाहानिमित्त लहानपणी कुटुंबासमवेत एकदा आल्याची माहिती उपलब्ध होते. आंबडवे येथे डॉ. आंबेडकर यांचे जुने झोपडीवजा घर होते. ते पाडून आता शासनाने या ठिकाणी स्मारक बांधले आहे. या ठिकाणी सकपाळ कुटुंबीयांची अनेक घरे आहेत. त्यांच्याकडून सकपाळ… आंबावडेकर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा आडनावाचा प्रवास येथे येणार्‍याला सांगितला जातो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news