डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे 16 खंड मराठीच्या प्रतीक्षेत | पुढारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे 16 खंड मराठीच्या प्रतीक्षेत

ठाणे ; अनुपमा गुंडे : माणसाला माणूस म्हणून जगण्याचे भान देणार्‍या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौखिक आणि लिखित साहित्य राज्य शासनाने खंड स्वरूपात इंग्रजीत प्रकाशित केले आहे. शासनाने प्रकाशित केलेल्या 22 खंडांपैकी केवळ 5 खंड मराठीत भाषांतरित झाले आहेत. उर्वरित 16 खंड भाषांतराच्या प्रतीक्षेत आहेत. गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांनी हे खंड त्या त्या राज्यांतल्या भाषेत यापूर्वीच प्रकाशित केले आहेत; मात्र महाराष्ट्राच्या भूमीतून देशाला घटना देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य मराठीत प्रदीर्घ काळ उपलब्ध नव्हते. राज्य शासनाने आता उर्वरित 16 खंडांचे मराठीत भाषांतर करण्याचे मनावर घेतले आहे.

गेल्यावर्षी 6 खंडांचे मराठीत भाषांतर प्रकाशित झाले आहे. 13 वा खंड प्रकाशनाच्या वाटेवर आहे. दलित चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या ‘जनता’ या पाक्षिकाचे अंक खंड स्वरूपात प्रकाशित करण्याची प्रक्रियाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन समितीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. समितीची यासंदर्भात नुकतीच बैठक पार पडली.

देशात आणि देशाबाहेर डॉ. आंबेडकरांची ओळख घटनाकार म्हणून होत असली, तरी याशिवायही त्यांनी दलित समाजासाठी मोठे काम केलेले आहे. डॉ. आंबेडकर अर्थतज्ज्ञ, राजकीय विश्‍लेषक, पत्रकार, भाष्यकार, उच्चविद्याविभूषित अशा चौफेर व्यक्‍तिमत्त्वाचे होते. त्यामुळे विविध प्रांतात डॉ. आंबेडकरांनी विपुल लेखन केले आहे.

त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन समितीने 1976 पासून आजतागायत 22 खंड प्रकाशित केले आहेत. या 22 खंडांपैकी एक खंड डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याचा वेध घेणार्‍या छायाचित्रांवर आधारित आहे. उर्वरित 21 खंडांपैकी सार्वजनिक वित्त या विषयावर बाबासाहेबांनी लिहिलेल्या इंग्रजी साहित्याचे 6 व्या खंडाच्या रूपात प्रकाशन केले आहे.

600 पानांचे दोन भाग

‘डॉ. आंबेडकर भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार’ या 13व्या खंडाचे प्रकाशन एप्रिलमध्ये होणार आहे. हा खंड प्रत्येकी 600 पानांच्या दोन भागांत प्रकाशित होणार आहे. डॉ. आंबेडकरांचे भाषण आणि पत्रकारितेवर 18, 19 आणि 20 हे खंड मराठीत प्रकाशित झाले आहेत. उर्वरित खंडांच्या भाषांतराच्या प्रक्रियेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन समितीने आणि राज्य शासनाने मनावर घेतले आहे, ही प्रक्रिया सध्या सुरू आहे.

Back to top button