सांगली महापालिकेत राष्ट्रवादी विरोधात काँग्रेस, भाजप एकवटले | पुढारी

सांगली महापालिकेत राष्ट्रवादी विरोधात काँग्रेस, भाजप एकवटले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : वादग्रस्त महासभेतील कार्यवृत्त वाचून कायम करण्याच्या विषयावर राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस व भाजप एकवटली आहे. सोमवारी (दि. 18 एप्रिल) होणार्‍या महासभेत कार्यवृत्त मंजुरीच्या विषयाला विरोध करणे, हा विषय मतदानाला घेण्याचा निर्णय काँग्रेस व भाजपच्या पार्टी मिटींगमध्ये झाला. त्यामुळे सोमवारी महासभा वादळी होईल, असे संकेत मिळत आहेत.

महासभा सोमवारी आहे. दि. 18 फेबु्रवारी रोजीच्या महासभेतील कार्यवृत्त वाचून कायम करण्याचा विषय या महासभेपुढे आहे. दरम्यान, दि. 18 फेबु्रवारीची महासभा कोरमअभावी झाल्याने ती बेकायदेशीर असल्याची तक्रार काँग्रेस व भाजपने यापूर्वीच आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाकडे दिलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील सभेचे कार्यवृत्त मंजुरीचा विषय या सभेच्या विषयपत्रिकेवर आल्याने काँग्रेस व भाजपने विरोध करण्याचा निर्णय घेतला.

भाजप पार्टी मिटींगमध्ये निर्णय

महापालिकेत बुधवारी सकाळी भाजपची पार्टी मिटींग झाली. अध्यक्षस्थानी गटनेते विनायक सिंहासने होते. स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक धीरज सूर्यवंशी, समाजकल्याण सभापती सुब्राव मद्रासी, महिला व बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे-पाटील तसेच भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या महासभेला कोरम नव्हता. तरीही महासभा झाल्याने ती बेकायदेशीर आहे. त्यामुळे मागील सभेचे कार्यवृत्त मंजुरीच्या विषयाला सोमवारच्या महासभेत विरोध करायचा असा निर्णय झाला. कार्यवृत्त मंजुरीचा विषय आणल्यास मतदानाची मागणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

काँग्रेसची पार्टी मिटींग बुधवारी दुपारी 4 वाजता झाली. गटनेते संजय मेंढे, उपमहापौर उमेश पाटील तसेच नगरसेवक उपस्थित होते. दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या महासभेचे कार्यवृत्त मंजुरीस विरोध करण्याचा निर्णय झाला. कार्यवृत्त मंजुरीच्या विषयावर मतदानाची मागणी करण्याचा निर्णय झाल्याचे गटनेते मेंढे यांनी सांगितले.

डीपीसीच्या प्रस्तावांवरूनही काँग्रेस आक्रमक

‘डीपीसी’ निधीतून काही कामे काँग्रेसला विश्वासात न घेता परस्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली जात असल्यावरून काँग्रेस पार्टी मिटींगमध्ये चर्चा झाली. त्यावरून काँग्रेसचे काही नगरसेवक आक्रमक झाले होते. त्यावरून महासभेत राष्ट्रवादीला काँग्रेसच्या रोषाचा सामना करावा लागणार आहेे.

काँग्रेसच्या सात नगरसेवकांचा वेगळा पवित्रा?

दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या महासभेचे कार्यवृत्त वाचून कायम करण्याच्या विषयावर काँग्रेसने विरोधी मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सहा ते सात नगरसेवक कार्यवृत्त वाचून कायम करण्याच्या बाजूने राहणार असल्याची चर्चा आहे.

मतदान कोणाचे?

दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या महासभेला जे होते, तेच मागील सभेचे कार्यवृत्त मंजुरीला मतदान करू शकतात, असा मुद्दा काहींकडून मांडला जात आहे. महापालिकेत त्याची चर्चा सुरू होती.

Back to top button