सातारा : मसूर पोलिस ठाण्यासाठी हिरवा कंदील ; राज्यपालांच्या आदेशानुसार शिक्‍कामोर्तब | पुढारी

सातारा : मसूर पोलिस ठाण्यासाठी हिरवा कंदील ; राज्यपालांच्या आदेशानुसार शिक्‍कामोर्तब

मसूर (सातारा) :  पुढारी वृत्तसेवा
मसूर, ता. कराड पोलिस ठाण्याबाबत राज्याच्या गृह विभागामार्फत अधिसूचना जारी केली असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार अखेर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मसूर पोलीस स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे. आता फक्त शुभारंभाची औपचारिकता बाकी आहे. सुमारे 35 गावांचे कार्यक्षेत्राचा यामध्ये सामावेश असणार आहे. येत्या महिन्याभरात पोलिस ठाणे अंतर्गत सर्व स्टाफ येथे दाखल होणार असून आरफळ कॉलनीच्या मोकळ्या खोल्यात तूर्त कारभार चालणार आहे. त्यादृष्टीने वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान झाल्या आहेत.

कराड तालुक्यातील मसूर गाव राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असून मसूरवरून खंडाळा-शिरवळ मार्ग, पाटण पंढरपूर मार्ग तसेच सातारा, सांगली जाणारी पर्यायी वाहतूक, पूर्वेकडे शामगाव घाट, उत्तरेला खराडे फाटा, दक्षिणेला सह्याद्री कारखाना, पश्चिमेला मसूर ते उंब्रज हायवे अशा पद्धतीचे पर्यायी व खुष्कीचे मार्ग असून त्या अनुषंगाने या परिसरात होणार्‍या चोर्‍या, घरफोड्या, दरोडे व जमीनजुमला, घरगुती व राजकीय वाद-विवाद छोट्या-मोठ्या गल्ली दादांचे टोळीयुद्ध, व्यापारी व सर्वसामान्याना असणारा धाक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न या पार्श्वभूमीवर सर्वच पातळीवर अपयशी ठरलेले मसूर पोलिस दूरक्षेत्रामधील अपूर्ण कर्मचारीवर्ग व त्यांच्या कामावरील अतिरिक्त ताण, वाढते कार्यक्षेत्र या महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करता मसूर येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन व्हावे अशी जनतेची गेल्या काही वर्षांपूर्वीपासून मागणी रखडली होती.

याबाबत ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव यापूर्वीच पाठवला होता. त्या अनुषंगाने असणारे कार्यक्षेत्र व कागदपत्रांचा आणि परिसरातील घडामोडींचा एकत्रित प्रस्ताव उंब्रज पोलीस ठाणे अंतर्गत तत्कालीन सपोनि हरीश खेडकर यांनी त्यावेळचे गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांना पाठवला होता. तर उंब्रज पोलिस ठाण्याचे सपोनि अजय गोरड यांनी राज्याचे ग्रहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे प्रस्ताव करून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी लक्ष घातल्याने आता त्यास मूर्त स्वरूप आले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री ना. दिलीप वळसेपाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराजे देसाई यांनीही इमारतीसाठी सहकार्य केले आहे. पोलीस ठाणे बांधण्यासाठी मोठी मोकळी जागा येथे उपलब्ध आहे. तत्पूर्वी पोलीस ठाण्याचा कारभार मसूर पोलीस दूरक्षेत्र नजीक असणार्‍या आरफळ कॉलनीच्या मोकळ्या खोल्यात सुरू राहणार आहे. येत्या महिन्याभरात पोलीस ठाणे अंतर्गतचा सर्व स्टाफ तेथे दाखल होणार आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button