शिखर शिंगणापूर (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेचा आज मुख्य दिवस असून मानाच्या कावडी आज मुंगीघाट चढणार आहेत. साहस आणि भक्तीशक्तीचा रोमहर्षक कावडसोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक शिंगणापूर नगरीत दाखल झाले आहेत.
शिंगणापूर यात्रेत चैत्र शुद्ध द्वादशीच्या दिवशी देवाच्या लग्नाची वरात म्हणून मानाच्या कावडी वाजतगाजत येऊन शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात. मुंगीघाटातून कावडी चढवण्याची परंपरा सुमारे 700 वर्षांपासून प्राचीन आहे. सासवड पंचक्रोशीतील सासवड, खळद, शिवरी, बेलसर, एखतपूर, कुंभारवळण यासह बारामती, इंदापूर, गुणवरे, माळशिरस, कण्हेर आदी ठिकाणच्या कावडी अवघड मुंगीघाट सर करत असतात. मुंगीघाट कावडी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मुंगीघाट सोलापूर जिल्हा हद्दीत आहे तर घाटाचा माथा सातारा जिल्हा हद्दीमध्ये आहे.
द्वादशीच्या दिवशी सकाळपासून सर्व कावडी मुंगीघाटाच्या पायथ्याशी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कोथळे गावात जमा होतात. त्यानंतर सुमारे तीन किलोमीटरचा टप्पा चढताना हजारो भाविक भक्तीरसात न्हाऊन निघतात. 'हरहर महादेव', 'म्हाद्या धाव' अशी शिवगर्जना करीत भाविक अवजड अशा कावडी घेऊन चार टप्प्यात मुंगीघाट सर करतात. खड्या असलेल्या डोंगरावरुन मानवी हातांची साखळी करुन कावडी घेऊन चढवताना भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. साहस, श्रद्धा आणि भक्तीशक्तीचा रोमहर्षक कावडसोहळा पाहण्यासाठी घाटमाथ्यावर उपस्थित असलेले लाखो भाविक श्वास रोखून कावडींचा थरार अनुभवत असतात. एकेक कावड मुंगीघाटातून माथ्यावर येताच उपस्थित लाखो भाविक टाळ्यांचा गजर करत कावडी घेऊन येणार्या भाविकांचा उत्साह वाढवित असतात.
डोंगर माथ्यावर कावडी घेऊन आल्यानंतर कावडीधारक भाविक ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत, हरहर महादेव गर्जना करीत, फटाक्यांच्या आतषबाजीत, कावडी नाचवून आनंद व्यक्त करतात. सकाळपासून सुरू असलेला मुंगीघाटातील कावडी सोहळा सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु असतो. सासवड येथील कैलास काशिनाथ कावडे यांच्या कावडीने मुंगीघाट सर करुन शंभू महादेवाच्या
पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर शिंगणापूर यात्रेची सांगता होते. दोन वर्षांच्या कालावधीनंतर कावडी सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी लाखो भाविक शिंगणापूर नगरीत दाखल झाले आहेत.
एकादशीच्या दिवशी लाखो भाविक शंभू महादेवाचा उपवास करुन दर्शन घेत असतात. यादिवशी मूळ इंदोर येथील होळकर राजघराण्यातील धनगर समाजातील काळगावडे राजे यांच्या दर्शनाचा मान आहे. तीन वर्षांपूर्वी शिंगणापूर यात्रेवरून परतत असताना वयोवृद्ध काळगावडे राजे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी असलेले गणेश काळगावडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील माळेगाव (ता. शेवगाव) येथून घोड्यावरुन प्रवास करुन मंगळवारी चैत्र एकादशीच्या दिवशी दर्शन घेतले. काळगावडे राजे यांनी पुष्कर तलावात पुण्यस्नान तसेच पुजाविधी करुन घोड्यावरुन जाऊन शंभू महादेवाचे दर्शन घेतले. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक शिंगणापूरनगरीत उपस्थित होते.