सांगलीत एकाच दिवशी चार घरफोड्या | पुढारी

सांगलीत एकाच दिवशी चार घरफोड्या

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील चार ठिकाणी घरफोडी करून दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत संबंधितांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी सांगितले, सांगलीवाडी येथेे आनंद सीताराम पाटील यांच्या बंद असलेल्या घराचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 74 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व काही रोख रक्कम घेऊन पोबारा केला. हा प्रकार सोमवारी भरदिवसा घडला. याबाबत पाटील यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

येथील शिवशंभू चौकातील शिवनगर येथे फरोज सलीम महात यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातून चांदीचे दागिने रोख रक्कम, असा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकारही सोमवारी दुपारी दीड ते दोन या दरम्यान घडला.

वखार भागात घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी तोळ्याचे मंगळसूत्र आणि रोकड चोरून नेली आहे. ही घटना रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी मनोज किसन सुतार यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. हळदभवननजीक सुतार हे कुटुंबासह राहतात. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्याने एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र आणि तीनशे रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला आहे. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला असून दोन साक्षीदार तपासले आहेत.

वखार भागातील त्रिमूर्ती चित्रमंदिरजवळ बल्लू हणमंत कातरल हे कुटुंबासह एका पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्यांच्या शेडच्या दरवाजाची साखळी काढून चोरट्याने त्यांचे दोन मोबाईल चोरून नेले. या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे.
मोबाईल, दुचाकी चोरीचे वाढते प्रकार

गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मोबाईल आणि दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. यातील अनेक गुन्ह्यांचा छडा अद्याप लागलेला नाही. त्यातच आता बंद असलेली घरे फोडली जात आहेत. त्यामुळे पोलिसांच्या समोर चोरट्यांचे आव्हान आहे.

Back to top button