सातारा : ‘सह्याद्री’ला विशेष व्याघ्र संरक्षण दलाची प्रतिक्षा! | पुढारी

सातारा : ‘सह्याद्री’ला विशेष व्याघ्र संरक्षण दलाची प्रतिक्षा!

कराड : अमोल चव्हाण
विनापरवाना लाकूड तोड, वन्यप्राण्यांची शिकार यासह अनेक गैरप्रकार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात घडत असल्याचे विविध प्रकारावरून समोर आले आहे. त्यामुळे सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षण हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाघांसोबत इतर जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन उत्कृष्ट व्हावे व जंगल ही सुरक्षित राहावे, यासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दल (स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स)ची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला गरजेचे असून त्याची प्रतिक्षा आहे.

अलीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व सह्याद्री लगतच्या बफर तसेच सह्याद्रीच्या पट्यात असलेल्या वेगवेगळ्या संवर्धन राखीव क्षेत्रात अनेकवेळा चोरटे शिकारी, बेकायदेशीर वृक्ष तोड, बंदूक घेऊन प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात प्रवेश करणे, वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी लावलेल्या ट्रॅप कॅमेरा चोरी करणे, औषधी वनस्पतींची तस्करी, विनापरवाना निवास करणे, वणवे लावणे अशा वेगवेगळ्या घटना वन्यजीव विभागाच्या समोर आल्या आहेत. तर काही ठिकाणी शिकरी संशयितही सापडलेले आहेत. हे प्रकार गंभीर आहेत.
महाराष्ट्रात मेळघाट (अमरावती), ताडोबा अंधारी (चंद्रपूर), पेंच (नागपूर), नवेगाव नागझिरा (गोंदिया), बोर (वर्धा) व पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव म्हणजे सह्याद्री (कोल्हापूर) हे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा शासनाचा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प असून त्याची व्याप्ती सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात आहे. 1165 चौ.किमी. मध्ये हा प्रकल्प व्यापला आहे. तशी मागणी तत्कालीन संबंधीत प्रकल्प क्षेत्र संचालकांनी केंद्र शासन व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडे पत्राव्दारे केली होती. तसेच मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनीही 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ही बाब लक्षात आणून दिली होती. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याचे महत्व ओळखून तत्काळ केंद्रीय वनमंत्री विराप्पा मोईली यांना पत्र लिहून या मागणीकडे त्यांचे लक्ष वेधले. मेळघाट व सह्याद्रीसाठी विशेष व्याघ्र संरक्षण दल तत्काळ मंजूर करावे अशी विनंती केली. त्यावेळी केंद्राने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला विशेष व्याघ्र संरक्षण दल मंजूर केले. परंतु सह्याद्री अद्यापही प्रतिक्षेतच आहे.

ताडोबा, पेंच, मेळाघाटला मिळाले, पण…

महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी ताडोबा अंधारी, पेंच या दोन व्याघ्र प्रकल्पांना 2011-2012 या कालावधीमध्ये विशेष व्याघ्र संरक्षण दल मिळाले आहे. तद्नंतर मेळघाटला पण हे दल 2014 मध्ये मिळाले आहे. याच धर्तीवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला विशेष व्याघ्र संरक्षण दलाची अत्यंत गरज आहे.विशेष व्याघ्र संरक्षण दलाला थेट केंद्र सरकारची परवानगी असते. यात एकूण 118 तरुणांचा समावेश असतो. 1 सहायक वनसंरक्षक, 2 वनपरिक्षेत्र अधिकारी आणि उर्वरीत वनरक्षक यांचा समावेश असतो.

केंद्र सरकारने 2009 साली मार्गदर्शक सूचना काढल्या होत्या. त्यामध्ये 13 व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘विशेष व्याघ्र संरक्षण दल निर्मितीची परवानगी दिली होती. वनविभागाने त्यांच्या पातळीवरच स्वतंत्र्य दलाची निर्मिती करावी, असे स्पष्ट केले आहे.
-रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक

हेही वाचलत का ?

Back to top button