सातारा : महाराष्ट्र केसरी बक्षिसावरून गदारोळ | पुढारी

सातारा : महाराष्ट्र केसरी बक्षिसावरून गदारोळ

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातार्‍यात जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील बक्षिसाच्या मुद्द्यावरून रविवारी जोरदार गदारोळ उडाला. महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या पै. पृथ्वीराज पाटील याने महाराष्ट्र केसरीच्या चंदेरी गदाशिवाय अन्य बक्षीस मिळाले नसल्याची खंत व्यक्‍त केली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर दिवसभर जोरदार रणकंदन झाले. त्याचबरोबर पृथ्वीराज पाटील याच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने 64 वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात शनिवारी झाली. मुख्य लढतीत पृथ्वीराज पाटील याने सोलापूरच्या विशाल बनकर याचा 5-4 असा पराभव केला. स्पर्धा झाल्यानंतर पृथ्वीराजला केवळ मानाची चंदेरी गदा देण्यात आली. त्यावरुन रविवारी गदारोळ उडाला.
पै. पृथ्वीराज पाटील याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पृथ्वीराज म्हणत आहे, यापूर्वी आयोजकांकडून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणार्‍यास रोख रक्‍कम म्हणून फूल ना फुलाची पाकळी देण्यात आली. सातार्‍यात आयोजकांनी मला केवळ गदा आणि किताब दिला. बक्षीस म्हणून रोख रक्‍कम दिली नसल्याची खंत व्यक्‍त केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर चर्चेला उधाण आले.

पृथ्वीराजने खंत व्यक्‍त केल्यानंतर सातार्‍यातून त्याच्यावर बक्षीसांचा ओघ सुरू झाला. सातारा-जावलीचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढाकार घेत पृथ्वीराजने महाराष्ट्र केसरी पटकावल्याबद्दल पाच लाखांची मदत जाहीर केली. त्या पाठोपाठ कै. शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 2 लाख रुपयांच्या बक्षीसाचा धनादेश पृथ्वीराज पाटील यांच्या मूळ गावी रवाना केला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिली. तर श्री. छ. प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघाकडून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पृथ्वीराजला बुलेट बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांनी सांगितले. सुशील मोझर यांच्याकडूनही 1 लाख 51 हजार जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला बक्षिसाची रक्‍कम संयोजक म्हणून आम्ही द्यावी, असे यजमानपद घेताना ठरले नव्हते. आम्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेस 21 लाख रुपयांचे धनादेश दिले. त्यातून प्रशिक्षकांचे मानधन, गुणफलक व अन्य तांत्रिक यंत्रणेसाठी हा निधी वापरला गेला. स्पर्धा आयोजित करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले अन् 51 हजार रुपये द्यायला कोणतीच अडचण नव्हती.
– दीपक पवार, संयोजक, 64 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा

64 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले त्यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजक म्हणून जिल्हा तालीम संघाकडे जबाबदारी सोपवण्यात आली. यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यपद्धतीची माहिती त्यावेळी जिल्हा तालीम संघाला देण्यात आली होती. त्यानंतर कुस्तीगीर परिषदेला तालीम संघाकडून चेक देण्यात आल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले असले तरी तो निधी पंचांचे मानधन व अन्य बाबींसाठी वापरण्यात आला. बक्षिसासाठी म्हणून कोणताही निधी अथवा चेक परिषदेकडे देण्यात आलेला नाही.
– ललित लांडगे, कार्यालयीन सचिव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

बक्षिसांचा असा सुरू झाला ओघ…

  • महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री सतेज पाटील यांनी 5 लाख रुपये जाहीर केले
  • देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 5 लाख रुपये जाहीर
  • आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून 5 लाख रुपये जाहीर
  • ना. शंभूराज देसाई यांच्याकडून 2 लाख रुपये जाहीर
  • खा. श्री. छ. उदयनराजे भोसले समर्थकांकडून बुलेट
  • सुशील मोझर यांच्याकडून 1 लाख 51 हजार रुपये जाहीर

Back to top button