नृसिंहवाडीत दत्त मंदिरात राम जन्मकाळ सोहळा उत्साहात | पुढारी

नृसिंहवाडीत दत्त मंदिरात राम जन्मकाळ सोहळा उत्साहात

नृसिंहवाडी : पुढारी वृत्तसेवा

येथील श्री दत्त मंदिरातील श्री राम मंदिरात रविवारी रामनवमीनिमित्त दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मकाळ सोहळा उत्साहात झाला.
यानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती व पूजा झाली. सकाळी अकरा वाजता राम मंदिरासमोर येथील वेदशास्त्रसंपन्न दिलीपशास्त्री उपाध्ये यांचे पुराण झाले.

बारा वाजता ‘प्रभू रामचंद्र की जय’च्या घोषात जन्मकाळ सोहळा झाला. उपस्थित भाविकांनी अबीर, गुलाल व फुलांची राम मंदिरासमोर बांधलेल्या व आकर्षक फुलांनी सुशोभित केलेल्या चांदीच्या पाळण्यावर उधळण केली. यानंतर धूप, दीप, आरती करण्यात आली. उपस्थित महिलांनी श्री रामाच्या पाळण्याची पूजा व आरती करून पाळणा पठण करण्यात आला. श्री राम व सीतामाई मूर्तीची ब—ह्मवृंदाच्या मंत्रघोषात विधिवत महापूजा केली. नंतर सर्व भाविकांना सुंठवडा प्रसाद वाटप करण्यात आले. येथील दत्त देव संस्थानमार्फत राममंदिर सुशोभित करून मंदिर परिसरात मंडप उभारण्यात आला होता.

Back to top button