सांगली : तोडणी मजुरांकडून घेतलेले पैसे वसूल करा - राजू शेट्टी | पुढारी

सांगली : तोडणी मजुरांकडून घेतलेले पैसे वसूल करा - राजू शेट्टी

सांगली : पुढारी वृत्तसेवा
तोडणी मजुरांनी ऊसतोडीसाठी दिवसाढवळ्या शेतकर्‍यांच्या पैशावर दरोडा टाकला आहे, ती रक्कम शेतकर्‍यांना परत द्या किंवा कारखान्या कडून होणारी ऊस तोडणीची कपात बंद करा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना राजू शेट्टी यांनी या मागणीचे निवेदन दिले. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तक्रारी करा, पैसे वसूल करून देऊ, अशी ग्वाही देवून ऊस संपेपर्यंत कारखाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे यावेळी स्पष्ट केले. निवेदनात म्हटले आहे : तोडणी मजुर, वाहन चालक आणि ऊसतोडणी मशीन मालक व स्लीप बॉय यांनी संगनमताने शेतकर्‍यांच्या हक्काच्या पैशावर दरोडा घातला आहे. तोडणीसाठी पाच हजारापासून वीस हजार रुपयांपर्यंत पैसे उकळले आहेत. साखर कारखाने देखील शेतकर्‍याच्या ऊसबिलातून तोडणीची रक्कम कपात करतात. ती कपात थांबवावी, एकाच कामासाठी दोनदा पैसे द्यावे लागत आहेत. ही कपात थांबवा किंवा टोळीवाल्याच्या तोडणी बिलातून ती रक्कम वसूल करून शेतकर्‍यांना परत द्यावी. तसेच असे न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.  यावेळी शेट्टी म्हणाले, जिल्ह्यात अद्याप मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आह. तो ऊस संपेपर्यंत कारखाने सुरू ठेवा अन्यथा ऊस जिल्हाधिकारी कार्यालयात टाकणार, असाही इशारा दिला आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनीही या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. तोडणी मुकादम, चालक आणि मशीनमालकाच्या विरोधात एकत्रित तक्रारी संघटनेच्या वतीने दाखल करा. आपण खात्री करून पैसे वसूल करू. ऊस संपेपर्यंत कारखाने सुरू ठेवा, असे आदेश सर्व साखर कारखान्यांना दिले असल्याचे यावेळी गायकवाड यांनी स्पष्ट केले. या वेळी सावकर मदनाईक, संजय खोळखुंबे, संजय बेले, सुरेश वसगडे, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button