सातारा : ‘किसनवीर’ कार्यक्षेत्रात जोरदार उठाव | पुढारी

सातारा : ‘किसनवीर’ कार्यक्षेत्रात जोरदार उठाव

सातारा : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या सहकारात एकेकाळी आदर्श ठरलेला ‘किसनवीर’ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी राज्यातील सत्ताधारी व विरोधकांना ‘पुढारी’ने हाक दिल्यानंतर ‘पुढारी’च्या या आक्रमक भूमिकेचे किसनवीर कारखाना कार्यक्षेत्रातील पाचही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी जोरदार स्वागत केले आहे. पाच लाख टन उसाची तातडीने तोडणी व्हावी कोट्यवधींची थकबाकी मिळावी व कामगारांची प्रलंबित देणी मिळावीत यासाठी जनतेतून जोरदार उठाव सुरू झाला असून प्रसंगी कृष्णाकाठी व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

देशभक्‍त किसनवीर आबा यांच्या नावाने कृष्णाकाठी भुईंजमध्ये किसनवीर सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. सहकारात एकेकाळी माईलस्टोन ठरलेला हा कारखाना अलीकडच्या काळात बेबंदशाहीमुळे पुरता रसातळाला गेला. शेतकर्‍यांची कोट्यवधी रूपयांची थकबाकी वाढली. कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. कामगारांचे हाल होवू लागले एवढेच काय सुमारे 14 लाख टन ऊस ज्या कार्यक्षेत्रात होतो त्या कार्यक्षेत्रातील 5 लाख टन ऊस गाळपाविना पडून राहिला आहे. शेतकर्‍यांनी अहोरात्र काबाडकष्ट करून काळ्यात मातीत राबून उसाचे पिक घेतले. सत्ताधारी व विरोधकांची साठमारी संपेल आणि कारखान्याचा प्रश्‍न मार्गी लागेल आणि आपण वाढवलेला ऊस आपल्या कारखान्यात गाळला जाईल अशी भाबडी आशा पाचही तालुक्यातील 54 हजार सभासदांची होती.

प्रत्यक्षात हातातोंडाला आलेल्या उसाची तोडणी कोणच करत नाही. शिवारात उभा राहिलेला ऊस कारखान्यात गाळपाला नेण्याऐवजी तो तसाच फड पेटवून देण्याची वेळ कर्जबाजारी शेतकर्‍यांवर आली आहे. रानोरानी शेतकरी घायकुतीला आला असताना दुसरीकडे कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले व आ. मकरंद आबा पाटील यांची राजकीय साठमारी संपता संपत नाही. कारखाना वाचावा व शेतकर्‍यांच्या संपूर्ण उसाचे गाळप व्हावे यासाठी कृतीशील प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळेच रडकुंडीला आलेल्या शेतकर्‍यांनी ‘पुढारी’कडे धाव घेतली. ‘पुढारी’नेही कृष्णाकाठच्या गोरगरीब शेतकर्‍यांची करूण कहानी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता प्रखरपणे मांडली. ‘पुढारी’च्या रोखठोक मधून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची व्यथा मांडली गेल्यानंतर दिवसभर शेकडो शेतकर्‍यांचे अभिनंदनाचे फोन पुढारीला येत होते. रोखठोक व आक्रमक भूमिकेचे ‘किसनवीर’ कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांनी जोरदार स्वागत केले आहे.

विधानसभेच्या सभागृहात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात रणकंदन झाले तरी प्रत्यक्ष पाच लाख टन उसाचे गाळप, शेतकर्‍यांची कोट्यवधींची थकबाकी, कामगारांची प्रलंबित देणी व किसनवीर कारखाना वाचवणे यावर कोणतीच चर्चा न झाल्याने शेतकरीही संतप्‍त आहेत. त्यामुळेच त्यांनी ‘पुढारी’द्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘पुढारी’च्या आक्रमक भूमिकेनंतर पाचही तालुक्यातील शेतकर्‍यांनी जोरदार उठाव सुरू केला असून किसनवीर कारखाना वाचला पाहिजे, तो तातडीने सुरू झाला पाहिजे. त्यासाठी वाट्टेल ते करू अशी भूमिका गावोगावच्या शेतकर्‍यांनी घेतली असून या विषयावरून व्यापक जन आंदोलन उभे करण्याची भूमिकाही अनेक शेतकर्‍यांनी बोलून दाखवली आहे.

सहकार मंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

किसनवीर सहकारी साखर कारखाना सातारा जिल्ह्यात येतो. राज्याचे सहकारमंत्रीपद सातारा जिल्ह्याकडे आहे. ना. बाळासाहेब पाटील यांनी आदर्श कार्यपध्दतीद्वारे आपला स्वत: चा सह्याद्री सहकारी साखर कारखाना चांगला चालवला आहे. बाळासाहेबांच्या या कार्यपध्दतीचे राज्यभर कौतुक होत असते. ना. बाळासाहेब पाटील यांनी किसनवीर कारखान्याच्या या विषयामध्ये लक्ष घालावे व 54 हजार सभासदांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा हजारो शेतकर्‍यांनी व्यक्‍त केली आहे. त्यामुळे ना. बाळासाहेब पाटील यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचलत का ?

 

Back to top button