सातारा : वकिलावर हल्‍ला दोघांजणांना अटक | पुढारी

सातारा : वकिलावर हल्‍ला दोघांजणांना अटक

सातारा : पुढारी वृत्तसेवा
शाहूनगर, सातारा येथे वकिलावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड करत एक डोळा निकामी करणार्‍या युवकांच्या टोळीची नावे समोर आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांच्या डीबी पथकाने ही मोहीम फत्ते केली.प्रतीक तानाजी कांबळे (वय 19, रा. मल्हार पेठ, सातारा), आकाश देवानंद (रा. रविवार पेठ) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अ‍ॅड. राम खारकर (वय 38, रा. शाहूनगर) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वकीलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 12 रोजी रात्री 10.30 वाजता घडली आहे.

तक्रारदार वकील राममोहन खारकर हे एम एच 11 डीके 0016 या कारमधून घरी निघाले होते. मोनार्क हॉटेलपासून पुढे चढानजीक आल्यानंतर तेथे 5 ते 6 युवक थांबलेले होते. संबंधितांना ‘रस्त्यावरुन बाजूला व्हा’, असे म्हटल्यानंतर संशयित युवकांनी तक्रारदार यांच्यासोबत वाद घातला व त्यांच्या अंगावर धावून गेले. संशयितांनी हल्ला चढवत कारच्या काचा फोडल्या व यातच वकिलांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. पुढे उपचारा वेळी त्यांचा डोळा निकामी झाला. सातार्‍यातील या घटनेने खळबळ उडाली व त्याचे तीव्र पडसाद उमटले.

वकील संघटनेने एक दिवस काम बंद आंदोलन करत तात्काळ संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी केली. गेली चार दिवस सातारा पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत होते मात्र त्यात यश येत नव्हते. अखेर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोनि संजय पतंगे, फौजदार नानासाहेब कदम, पोलिस अमित माने, लैलेश फडतरे यांना संशयित आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाने प्रतिक कांबळे यांच्या मुसक्या आवळल्या. संशयिताचा ताबा शहर पोलिसांकडे देण्यात आला असून बुधवारी याप्रकरणातील दुसर्‍या संशयितालाही अटक करण्यात आली आहे. इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button