India and Russia : भारताला रशियाकडून स्वस्तात मिळणार क्रूड तेल! | पुढारी

India and Russia : भारताला रशियाकडून स्वस्तात मिळणार क्रूड तेल!

नवी दिल्‍ली ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेनदरम्यान युद्ध सुरू असले तरी जुना मित्र रशियाकडून भारताला (India and Russia) क्रूड तेलाचे तब्बल 35 लाख बॅरल्स भारताला सवलतीच्या दरात मिळण्याची शक्यता आहे. हे तेल भारतात पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेला विमा आणि वाहतुकीची जबाबदारीही रशिया स्वीकारणार आहे.

रशियाने युक्रेनवर युद्ध लादल्याने अमेरिकेसह मित्रराष्ट्रांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. मात्र, भारत याबाबत तटस्थ असून, रशियाच्या जुन्या मैत्रीशी बांधील आहे. त्यामुळे रशियाकडून क्रूड ऑईलचा व्यवहार केला आहे. जगाने रशियावर निर्बंध लादले असताना भारताने रशियाकडून कच्चे तेल घेतल्यास त्याची किंमत भारताला मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. (India and Russia)

तेलमंत्री हरदीप पुरी यांनी राज्यसभेत या व्यवहाराचे सूतोवाच केले. या आयातीचे प्रमाण थोडे असले, तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर भडकलेले असताना भारताला सलवतीच्या दरात ते मिळणे महत्त्वाचे ठरते. रशिया-युक्रेन युद्धात कोणाचीही बाजू न घेण्याची भूमिका भारताने घेतलेली असली, तरी रशियाने स्वस्तात क्रूड तेल पाठविण्याची तयारी दर्शविली, याबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

चीनमधील लॉकडाऊन, इराणची अणुचर्चा आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भडकलेल्या कच्च्या तेलाच्या किमती गेल्या दोन दिवसांत पुन्हा पूर्वपदावर आल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर 100 डॉलर्सपेक्षा कमी झाले.

अमेरिकेचा भारताला इशारा

दरम्यान, भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात केले, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकन काँग्रेसचे डॉ. अमी बेरा यांनी या व्यवहारावर नापसंती व्यक्‍त केली. ते म्हणाले, भारताने तेल आयात केले, तर तो व्लादिमीर पुतीन यांच्या बाजूने उभा आहे, असा त्याचा अर्थ होईल.

संपूर्ण जग रशियाविरुद्ध उभे असताना भारताने त्याची बाजू घेतली, तर भारताला किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जेक सॉकी म्हणाले, भारताने तेल आयात केले, तर तो एका चुकीच्या देशाच्या पाठीशी उभा राहिला, अशी इतिहासात नोंद होईल.

Back to top button