सातारा : पुढारी वृत्तसेवा
'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशीच काहीशी अवस्था कास येथील ग्रामस्थांची झालेली आहे. सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्या कास तलावावरून डोक्यावरून पाणी वाहून नेण्याची वेळ कास गावातील महिला व ग्रामस्थांवर आली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून गावातील महिलांना कास तलावातून पाणी आणावे लागत आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. कास गावातील पाण्याची योजना ही झर्यावरून असून हा झरा कास पठाराच्या कडेला आहे. गेल्या 50 वर्षांपासून 2 कि.मी. अंतरावरून गावाला पाणी येत आहे. परंतू, पाण्याच्या टाकीचे काम मनमानीपणे केले गेल्याने कास गावाला गेली आठ दिवस पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे. पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप कास ग्रामस्थांनी केला आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनीही दुर्लक्ष केले आहे.
याबाबत गटविकास अधिकार्यांना माहितीसाठी फोन केला तर ते फोन घेत नाहीत तर स्थानिक शासकीय कर्मचारीही माहिती देत नाहीत, असे ग्रामस्थ सांगतात.तरी कास गावातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी संबंधितांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी कास ग्रामस्थांतर्फे दत्तात्रेय किर्दत, सोमनाथ बुढळे, रामचंद्र गणपत किर्दत, नारायण गोरे, धोंडीबा किर्दत, श्रीरंग सुर्वे, मारूती किर्दत, राणू किर्दत, रामचंद्र आबाजी किर्दत, दिनकर किर्दत यांनी केली आहे. याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.