उपनगरात मटक्यातून उफाळतोय वर्चस्ववाद

उपनगरात मटक्यातून उफाळतोय वर्चस्ववाद
Published on
Updated on

खेड : अजय कदम
सातारा शहराच्या उपनगरातील विविध भागात चौकाचौकात टपर्‍या टाकत पानबिडीच्या नावाखाली मटका घेण्यात येत आहे. या टपर्‍यांमधील मटक्यातून होणारी उलाढाल, व्यवसायावर पकड ठेवण्यासाठी होणार्‍या वादावादीमुळे उपनगरात अशांतता निर्माण होत आहे. जिल्हापरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत अवैध व्यवसाय करणार्‍या मुख्य बुकींनी नशीब आजमवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या पाठबळावर उपनगरातील मुख्य चौकात त्यांचे पंटर दिवस – रात्र धुडगूस घालत आहेत.

Satara Crime : फळकुटदादांमधून मटकाबुकी तयार

सातारा शहराच्या उपनगरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक, वाढे फाटा, अजंठा चौक, विसावा नाका, संगमनगर, देगावफाटा या भागात दिवसेंदिवस वाढणार्‍या टपर्‍या आणि त्या टपर्‍यांतील अवैध व्यवसायामुळे उपनगराची कुप्रसिद्धी होत चालली आहे. या टपर्‍यांमागे मोठे अर्थकारण दडले असून कोणी स्थानिक फळकुटदादा या ठिकाणी बांधकाम विभागातील अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने प्रोटेक्शन मनी गोळा करतो.त्याच्या परवानगी शिवाय खोकीच काय? पथारीही पसरता येत नाही हे उघड गुपित आहे. उपनगरातील फळकुटदादांमधून मटकाबुकी तयार झाले आहेत. मनगटाच्या जोरावर विनाभांडवली मटक्यातून बरकत मिळवणे सोपे असल्याने रिकामटेकडे युवक त्यात शिरत आहेत. यातून इतर व्यवसायांप्रमाणे मटक्यांच्या शाखा विस्तार करण्यावरून एकमेकांच्या एरियात घुसखोरी होऊ लागली आहे. या मटक्याच्या धंद्यात कार्यरत असणार्‍या युवकांमध्ये या भागात अनेक दिवसांपासून बुकलाबुकली सुरू आहे.

अशीच एक घटना नुकतीच बॉम्बे रेस्टॉरंट चौक, वाढे चौक देगाव फाटा येथे घडली. त्यामागे मटक्याच्या शाखा विस्ताराचा वाद कारणीभूत असल्याची चर्चा आहे. सातारा शहरासह उपनगरातील अनेक मटकाबुकींनी आपल्या व्यवसायाच्या शाखा इतर शहरात सुरू केल्याची चर्चा आहे. त्या ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडल्याची चर्चा आहे. पोलीस कानाडोळा करत असल्याने मटक्याच्या जोरावर सर्वसामान्यांवर दहशत निर्माण करणार्‍यांचे फावत आहे.

युवकांच्या जोरावरच बुकींची राजकीय आतषबाजी

काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येवून ठेपल्या आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मोर्चेबांधणी करणार्‍यांमध्ये बहुतांश अवैध व्यवसाय करणार्‍या युवकांचा समावेश आहे. छोटी – मोठी समाजकार्य करत असल्याचा आव आणत हे युवक स्वतःभोवती अवैध व्यवसायाशी निगडित युवकांचे कोंडाळे जमवत त्या कोंडाळ्याच्या जीवावर मुख्य बुकी राजकीय आतषबाजी करत आहेत. पोलिसांच्या वरदहस्तामुळेच फळकुटदादांची गुंडगिरी वाढत चालली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news