पनवेल : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील यांच्यासह शंकर ठाकूर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल | पुढारी

पनवेल : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील यांच्यासह शंकर ठाकूर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पनवेल, पुढारी वृत्तसेवा

एका महिलेचे तिच्या मित्रासोबतचे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि सल्लागार बबन पाटील यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित पिडित महिलेने पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पिडित महिला ही करंजाडे वडघर येथील रहिवासी असून, ती आपल्या पतीपासून विभक्त राहते. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या मित्रासोबत काढलेले सेल्फी फोटो, बबन पाटील यांनी 30 जानेवारी रोजी जय शिव छत्रपती या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केले. त्यानंतर खारघर शहराचे माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांनीही 29 जानेवारीला काही फोटो महाविकास आघाडी खारघर आणि वैभव दळवी युवा मंच खारघर या ग्रुपवर एका मेसेजसह व्हायरल केले. ही बाब संबंधीत महिलेला समजताच त्यांनी याबाबत शंकर ठाकूर यांच्या घरी जावून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ठाकूर यांनी, महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. तसेच तुझ्या मित्रासोबत जसे फोटो काढलेस तसेच माझ्यासोबतही काढ असे म्हणत आपला हात धरून अंगलट करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर महिलेने ठाकूर यांच्यावर पोलीस तक्रार दाखल केली. या प्रकरणी बबन पाटील आणि शंकर ठाकूर यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मला बदनाम करण्याच्या प्रयत्न सुरू असून ही राजकीय खेळी आहे. माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे मला आज माध्यमातून समजले. या तक्रारीबाबत पोलीस ठाण्यातून मला कोणताही फोन आलेला नाही. तसेच हे अंतर्गत राजकारण आहे. राजकीय सुडातून हा प्रकार झाला आहे. मला केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

– बबन दादा पाटील, माजी जिल्हा प्रमुख

पक्षातील वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली घटना मला समाजमाध्यमातून समजली आहे. शिवसेना पक्ष हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. आणि असा प्रकार जर घडला असेल तर या बाबत पक्षाचे वरिष्ठ नेते या प्रकरणाची चौकशी करून योग्य तो निर्णय घेतील.

– शिरीष घरत, जिल्हा प्रमुख

 

हेही वाचा

Back to top button