नाशिकमध्ये एका वर्षात आढळले इतक्या जणांचे बेवारस मृतदेह ; नातलगांअभावी ओळख पटत नसल्याने अंत्यसंस्कार - पुढारी

नाशिकमध्ये एका वर्षात आढळले इतक्या जणांचे बेवारस मृतदेह ; नातलगांअभावी ओळख पटत नसल्याने अंत्यसंस्कार

नाशिक : गौरव आहिरे : जन्माला आल्यानंतर ओळख निर्माण होते आणि ती शेवटपर्यंत टिकते, असे सर्वत्र दिसते. मात्र, काही जणांच्या नशिबी ही ओळख ‘अनोळखी’ असते. शहरात जानेवारी ते डिसेंबर 2021 या कालावधीत 169 जणांचे बेवारस मृतदेह आढळून आले. मात्र, या मृतदेहांची ओळख न पटल्याने ते अनोळखी मृतदेह म्हणून पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे या 169 जणांच्या नशिबी नातलगांकडून अंत्यसंस्कारही झाले नाही किंवा त्यांची ओळखही पटली नाही.

नाशिक शहरास अनेक वर्षांचा धार्मिक, पौराणिक इतिहास असून, गेल्या काही वर्षांत शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे अनेकांची स्वप्ने या शहरात पूर्ण होताना दिसतात. शहराच्या विस्तारीकरणासोबत लोकसंख्येचा आकडाही फुगला आहे. या लोकसंख्येपैकी अनेक जणांची ओळख आजही शासन दप्तरी नाही. त्यामुळे असे नागरिक भीक मागून किंवा मिळेल ते खाऊन गुजराण करताना दिसतात. त्यांचा पूर्वेतिहास जाणून घेण्याची तसदी कोणतीही यंत्रणा करीत नाही किंवा कोणाला उत्सुकताही नसते. अशातच ऊन, पाऊस, वारा सोसत शरीर कृष होऊन अनेकजण या जगाचा निरोप घेतात, तर अनेक जणांचा नशेच्या आहारी गेल्याने किंवा आकस्मिक मृत्यू होतात.

शहरात सर्वाधिक 68 बेवारस मृतदेह पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आले आहेत. त्यापैकी बहुतांश मृतदेह गोदातिरी आढळले आहेत. त्या खालोखाल 21 मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात किंवा जवळील परिसरात आढळून आले. त्याचप्रमाणे नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 18, भद्रकालीच्या हद्दीत 16, आडगावच्या हद्दीत 11, अंबड, उपनगरच्या हद्दीत प्रत्येकी 7-7, मुंबई नाकाच्या हद्दीत सहा व शहराच्या इतर ठिकाणी 21 मृतदेह आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात व जवळील परिसरात 21 बेवारस मृतदेह आढळून आले. त्यात काहींवर रुग्णालयातच उपचार सुरू होते. मात्र, ते पळून गेल्याने किंवा त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर ते आवारातच राहात असल्याचे आढळले होते, तर काही बेवारस व्यक्तींना रिक्षाचालक किंवा इतर नागरिक जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आणून उपचारासाठी सोडून देतात. मात्र, उपचाराअभावी किंवा उपचार पूर्ण न केल्याने किंवा नैसर्गिकरीत्या त्या व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचे आढळून आले आहे.

बेवारस मृतदेह सापडल्यानंतर संबंधित पोलिस काही दिवस मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न करतात. ओळख न पटल्यास त्याचा अहवाल महापालिकेकडे सादर केला जातो. त्यानंतर महापालिकेमार्फत या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. शहरात 156 पुरुष, 13 महिलांचे बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. त्यात 30 वयोगटापर्यंतचे पाच, 31 ते 40 वयोगटातील 27, 41 ते 50 वयोगटातील 44 मृतदेह, 51 ते 60 वयोगटातील 45 व 60 वयोगटापुढील 39 जणांचे बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. त्यांची ओळख पटलेली नव्हती.

पंचवटीत बेवारसांची गर्दी
पंचवटी परिसराला धार्मिक महत्त्व असल्याने व कुंभमेळा येथेच भरत असल्याने देशभरातून भाविक, पर्यटक येत असतात. त्यापैकी काही पाल्य त्यांच्या वृद्ध पालकांना या ठिकाणी बेवारस सोडून निघून जातात. त्यानंतर पालकांना वारस नसल्याने ते भीक मागून गुजराण करतात. यातच नैसर्गिकरीत्या किंवा एखाद्या आजाराने या वृद्ध पालकांचा मृत्यू होतो. मात्र, त्यांची ओळख न पटल्याने ते बेवारस म्हणूनच या जगाचा निरोप घेतात.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी ठरला संकटातील प्राण्यांचा ‘दादा’

Back to top button