सातारा : खूनप्रकरणी मुलाला जन्मठेप | पुढारी

सातारा : खूनप्रकरणी मुलाला जन्मठेप

सातारा : पुढारी वृत्तसेवा, साठे फाटा, ता. फलटण येथे वडीलांच्या डोक्यावर, तोंडावर फरशीच्या तुकड्याने हल्ला चढवून त्यांचा खून केल्याप्रकरणी मुलगा शामसुंदर नारायण इंगळे ( रा.साठेफाटा) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, 2018 साली ही घटना घडलेल्या या घटनेत सुरुवातीला हाफ मर्डरचा तर मृत्यूनंतर खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.

नारायण भिकू इंगळे असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. याप्रकरणी विजय रामचंद्र इंगळे यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 30 मे 2018 रोजी ही घटना घडली आहे. रात्री साडेनऊ वाजता मुलगा शामसुंदर याने वडील नारायण इंगळे यांना स्टोव्हचा पंप सापडत नसल्याने वाद घातला. हा वाद एवढा विकोपाला गेला की संतप्त झालेल्या मुलाने वडीलांवर फरशीच्या तुकड्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात फरशीचा डोक्यावर, कपाळावर व कानावर वर्मी घाव बसल्याने नारायण इंगळे गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेत नारायण इंगळे यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. यामुळे हाफ मर्डरचा गुन्हा खूनात दाखल झाला. या सर्व प्रकरणाचा तपास फलटण ग्रामीणचे फौजदार आर.आर.भोळ यांनी करुन दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले.

जिल्हा न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड.मिलिंद ओक यांनी युक्तिवाद करत 6 साक्षीदार तपासाले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी आरोपी शामसुंदर इंगळे याला जन्मठेप व 5 हजार रुपये दंड तो दिल्यास 6 महिने साधी अशी शिक्षा ठोठावली. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार उर्मिला घार्गे, शमशुद्दीन शेख, सुधीर खुडे, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी सहकार्य केले.

हेही वाचलंत का? 

Back to top button