सांगली जिल्ह्यात जमावबंदी, संचारबंदी लागू, नियमभंग करणार्‍यांवर कडक कारवाई | पुढारी

सांगली जिल्ह्यात जमावबंदी, संचारबंदी लागू, नियमभंग करणार्‍यांवर कडक कारवाई

सांगली, पुढारी वृत्तसेवा: कोरोना प्रतिबंधासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली. नियमभंग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी तर रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लग्न समारंभ आणि अंत्ययात्रेवर देखील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

डॉ. चौधरी म्हणाले, सर्व शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेस दि. 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये देखील नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी, खासगी आस्थांपनामध्ये केवळ 50 टक्के कर्मचार्‍यांना परवागी असेल. उर्वरित कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना द्याव्यात. शासकीय कार्यालयात देखील संबंधित अधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रवेशबंदी करण्यात आली आहे. लग्न समारंभ 50 तर अंत्ययात्रेसाठी 20 जणांना परवानगी आहे. मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे.

सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. सलून, ब्युटी सलून इत्यादींना 50 टक्के क्षमतेने परवानगी आहे. परंतु केशकर्तन करणार्‍या कर्मचार्‍याचे दोन्ही डोस पूर्ण असणे आवश्यक आहे. जलतरण तलाव, स्पा सेंटर, करमणूकनगरी, प्राणी संग्रहालये बंद असतील.

शॉपिंग सेंटर, मॉल्स, मार्केट, कॉम्प्लेक्स इत्यादी ठिकाणी 50 टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे, परंतु या ठिकाणी अँटीजेन चाचणी कक्ष उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयास्पद व्यक्तींची येथे तत्काळ चाचणी करण्यात येणार आहे. दोन्ही डोस पूर्ण असलेल्यांनाच यामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. रेस्टॉरंट, उपहारगृहे, सिनेमा थिएटर यांना 50 टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे.

लसीकरण झालेल्या व्यक्तींना माल वाहतूक, औद्योगक वाहतूक, प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यात प्रवेश करण्यासाठी 72 तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली असल्याचेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.

जिल्ह्यात याची काटेकोर अंमलबजावणी होणार

  1. शाळा, महाविद्यालये, जलतरण तलाव, स्पा सेंटर, प्राणी संग्रहालये बंद
  2. कार्यक्रम, मॉल्स, हॉटेल्स, जिम, थिएटर 50 टक्के क्षमतेने
  3. राज्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी आवश्यक
  4. स्पर्धा परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार
  5. परवानगीशिवाय शासकीय कार्यालयात प्रवेशबंदी

नियमभंग केल्यास तुरुंगवासाची तरतूद

डॉ. चौधरी म्हणाले, कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उल्लंघन करणार्‍या व्यक्तीला पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. ज्या जागेवर अथवा आस्थापनांमध्ये नियमभंग होईल, त्यांना 10 हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. खासगी वाहनांंचा परवाना काढून घेण्यात येईल. वारंवार नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांना अटक आणि तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.

Back to top button